निनाद करमरकर,अंबरनाथ : अंबरनाथ नगरपालिकेच्या दोन शाळांमध्ये इंग्रजी माध्यम सुरू करण्यात आलं आहे. आज या दोन शाळांचं उद्घाटन आमदार डॉ. बालाजी किणीकर आणि मुख्याधिकारी डॉ. प्रशांत रसाळ यांच्या हस्ते करण्यात आलं. काळासोबत चालण्यासाठी इंग्रजी माध्यमातून शिक्षण देणं आवश्यक असल्याचं मत यावेळी आमदार बालाजी किणीकर यांनी व्यक्त केलं.
अंबरनाथ नगरपालिकेच्या शहरात १७ शाळा असून यामध्ये मराठी, हिंदी, गुजराती आणि उर्दू माध्यमाच्या शाळांचा समावेश आहे. या शाळांमध्ये जवळपास २२०० विद्यार्थी सध्या शिक्षण घेत आहेत. मात्र काळानुरूप इंग्रजी माध्यमांकडे पालकांचा ओढा वाढू लागल्यानं पालिकेच्या शाळांची पटसंख्या दिवसेंदिवस कमी होत चालली आहे. त्यामुळे पालिकेच्या शाळांमध्येही इंग्रजी माध्यमातून शिक्षण मिळावं, या उद्देशाने अंबरनाथ नगरपालिकेच्या दोन शाळांमध्ये इंग्रजी माध्यम सुरू करण्यात आलं आहे.
अंबरनाथ पालिकेची शाळा क्रमांक १ आणि ८ मध्ये इंग्रजी माध्यम सुरू करण्यात आलं असून या शाळांचं आज आमदार डॉ. बालाजी किणीकर आणि मुख्याधिकारी डॉ. प्रशांत रसाळ यांचा हस्ते उद्घाटन करण्यात आलं. या कार्यक्रमाला माजी नगरसेवक सुभाष साळुंखे, माजी नगराध्यक्षा प्रज्ञा बनसोडे यांच्यासह पालिकेचे अधिकारी आणि राजकीय पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते.
काळासोबत चालण्यासाठी सध्या २ शाळा इंग्रजी माध्यमातून सुरू करण्यात आल्या असून येत्या काळात आणखी ५ शाळा इंग्रजी माध्यमातून सुरू करण्यात येतील, अशी माहिती यावेळी आमदार डॉक्टर बालाजी किणीकर आणि मुख्याधिकारी डॉ. प्रशांत रसाळ यांनी दिली.