ठाणे : ठाणे महापालिकेच्या वतीने सन 2022-23 या आर्थिक वर्षाची मालमत्ता कराची देयके उपलब्ध करुन देण्यात आली आहेत. जे करदाते सन 2022-23 या आर्थिक वर्षाच्या मालमत्ता कराच्या देयकातील पहिल्या सहामाहीच्या मालमत्ता करासोबत दुसऱ्या सहामाहीचा मालमत्ता कर (Property Tax), अशी संपूर्ण कराची रक्कम एकरकमी 15 जून,2022 पर्यंत महापालिकेकडे जमा करतील, अशा करदात्यांना त्यांच्या दुसऱ्या सहामाहीच्या देयकातील सामान्य करामध्ये 10 टक्के सवलत (Discount) देण्यात येणार आहे. तरी नागरिकांनी या योजनेचा लाभ घेवून सहकार्य करण्याचे आवाहन (Appeal) ठाणे महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे. दरम्यान करदात्यांना सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी कर भरता येणे शक्य व्हावे, याकरीता प्रभाग कार्यालयाकडील संकलन केंद्रे शनिवारी आणि रविवारी कार्यान्वित राहणार आहेत.
सन 2022-23 या आर्थिक वर्षाची मालमत्ता कराची देयके वितरीत करण्याचे काम प्रभाग समिती स्तरावरुन सुरू आहे. जे नागरिक 15 जून पर्यंत पहिल्या सहामाहीच्या मालमत्ता करासोबत दुसऱ्या सहामाहीचा मालमत्ता कर अशी संपूर्ण कराची रक्कम एकत्रित जमा करतील त्यांना 10 टक्के सवलत देण्यात येणार आहे. तसेच 16 जून ते 30 जून, 2022 पर्यंत 4 टक्के, 1 जुलै ते 31 जुलै पर्यंत 3 टक्के तर 1 ऑगस्ट ते 31 ऑगस्ट, 2022 पर्यंत जमा केल्यास 2 टक्के सवलत देण्यात येणार आहे.
ठाणे महानगरपालिकेच्या कोणत्याही प्रभाग समिती कार्यक्षेत्रातील करदाते त्यांचा मालमत्ता कर महापालिकेच्या कोणत्याही कर संकलन केंद्रावर रोख, धनादेश, धनाकर्ष तसेच डेबीट कम एटीएम कार्ड, क्रेडीट कार्डद्वारे कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी सकाळी 10.30 ते 4.30 या वेळेत जमा करु शकतील. तसेच सदर सवलत योजनेकरीता करदात्यांचा प्रतिसाद पाहता करदात्यांना सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी कर भरता येणे शक्य व्हावे, याकरीता प्रभाग कार्यालयाकडील संकलन केंद्रे शनिवार 28 मे, 2022 रोजी सकाळी 10.30 ते सायं 5 तसेच रविवार 29 मे, 2022 रोजी सकाळी 10.30 ते दुपारी 1.30 वाजेपर्यंत कार्यान्वित राहणार आहेत. तरी नागरिकांनी या योजनेचा लाभ घेवून सहकार्य करण्याचे आवाहन ठाणे महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे. (Appeal of Thane Municipal Corporation to pay property tax till June 15 and get 10% discount)