आता राज्याला गणेशोत्सवाची आस लागली आहे. गणपती उत्सवाची धूम असते. आतापासूनच अनेक मंडळांनी बाप्पांच्या मूर्तीचे बुकिंग सुरु केले आहे. अनेक मंडळांनी यंदा पर्यावरण पूरक बाप्पाला पसंती दिली आहे. शाडू मातीचे, इको फ्रेंडली गणबत्ती बाप्पा वाजत गाजत घरी आणण्याचे अनेकांनी ठरवले आहे. परदेशात पण या इको-फ्रेंडली गणेश मूर्तींची मागणी वाढली आहे. बदलापूरमधील चिंतामणी क्रिएशन्सच्या माध्यमातून दरवर्षी हजारो पर्यावरणपूरक गणेशमूर्ती परदेशात पाठवल्या जातात.
सहा महिन्यांपासून तयारी
गणेशोत्सव आता महिन्याभरावर आला असून मूर्तिकारांची लगबग सुरू झाली आहे. तर परदेशात असलेल्या भारतीयांनाही बाप्पाच्या आगमनाचे वेध लागले आहेत. या परदेशातील भाविकांना बाप्पाचा पाहुणचार करता यावा, यासाठी बदलापूरचे तरुण उद्योजक निमेश जनवाड यांच्या चिंतामणी क्रिएशन्सकडून दरवर्षी हजारो गणपती बाप्पा परदेशात पाठवले जातात. बाप्पांचा हा प्रवास लांबचा असल्यानं अगदी ६ महिने आधीपासूनच गणपती बाप्पांच्या परदेशवारीला सुरुवात होते.
मार्च महिन्यापासून ते ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत बाप्पांची ही परदेशवारी अखंडपणे सुरू असते, ज्यात हजारो गणपती बाप्पा आपल्या परदेशातल्या भक्तांकडे रवाना होत असतात. दरवर्षी अमेरिका, कॅनडा, इंग्लंड, युरोप, आखाती देश, सिंगापूर, मलेशिया, थायलंड, ऑस्ट्रेलिया अशा जगातल्या अनेक देशांमध्ये निमेश जनवाड हे गणेशमूर्ती पाठवत असतात. त्यामुळे परदेशात वास्तव्याला असलेले भारतीय तिकडे राहून आपल्या लाडक्या बाप्पाचा पाहुणचार करू शकतात. यंदा निमेश जनवाड यांच्या माध्यमातून ८० हजार बाप्पा परदेश वारीला रवाना झाले आहेत.
जगभरात ८० हजार गणेशमूर्ती रवाना
निमेश जनवाड या तरुण उद्योजकांनी मागील ७ वर्षांपासून गणेशमूर्ती निर्यात करायला सुरुवात केली. दुबईतील मसालाकिंग धनंजय दातार यांनी त्यांना संधी दिली आणि सुरुवातीला काही गणेशमूर्तींची ऑर्डर दिली. २०१७ साली चिंतामणी क्रिएशन्स या व्यवसायाची सुरुवात केलेल्या निमेश यांनी २०१८ साली ३ हजार आणि २०१९ साली साडेतीन हजार गणेशमूर्ती परदेशात पाठवल्या होत्या. तर २०२० साली कोरोनामुळे निर्यात बंद झाल्यानं त्यांना तब्बल ४० लाख रुपयांचा फटका बसला होता.
त्यानंतर २०२१ साली त्यांनी मोठी झेप घेत २० हजार गणेशमूर्ती निर्यात केल्या होत्या, तर २०२२ साली ३५ हजार, २०२३ साली ५० हजार गणेशमूर्ती निमेश यांनी परदेशात पाठवल्या होत्या. वर्षागणिक त्यांच्या पर्यावरणपूरक गणेशमूर्तींना परदेशात मागणी वाढत असून यंदा त्यांनी जगभरात ८० हजार गणेशमूर्ती पाठवल्या आहेत. त्यांनी पाठवलेल्या गणेशमूर्तींमुळे परदेशातल्या भारतीयांचा गणेशोत्सव धुमधडाक्यात साजरा होणार आहे.