ठाणे, रायगड आणि पुणे जिल्ह्यात मागील 24 तासांपासून कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे उल्हास नदीचा प्रवाह मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे नदीचं पाणी रस्त्यावर आल्याने बदलापूरहून कर्जतकडे जाणारा राज्य महामार्ग बंद झाला आहे. बदलापूर आणि वांगणी दरम्यान चामटोली गावाजवळ रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचलं आहे. त्यामुळे पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून कर्जतकडे जाणारा हा राज्य महामार्ग बंद केला आहे. काही वर्षांपूर्वी याच चामटोली गावाजवळ उल्हास नदीचं पाणी रेल्वे रुळावर आल्यामुळे महालक्ष्मी एक्सप्रेस पुराच्या पाण्यात अडकून पडली होती. आता पुन्हा एकदा चामटोली गावात पुराचं पाणी रस्त्यावर आल्यामुळे त्या भयावह पुराच्या आठवणी जाग्या झाल्या आहेत.
अंबरनाथ शहर आणि परिसरात मागील 24 तासांपासून कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे अंबरनाथ तालुक्यात उगम पावणाऱ्या वालधुनी नदीला मोठा प्रवाह आला आहे. ही नदी अंबरनाथच्या प्राचीन शिवमंदिराच्या बाहेरून वाहत असून नदीचं पाणी मंदिराकडे जाणाऱ्या पुलाच्या वरून गेल्यामुळे शिवमंदिराकडे जाणारा रस्ता बंद करण्यात आला आहे. नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून खबरदारीचा उपाय म्हणून रस्ता बंद करण्यात आला आहे. नदीचा प्रवाह कमी होईपर्यंत शिवमंदिराचा रस्ता बंद करण्यात आला आहे.
उल्हास नदीने धोक्याची पातळी ओलांडल्याने बदलापूरमधील सखल भागात पाणी साचले आहे. बदलापूर गावातील सोनिवली गाव परिसरात गुडघाभर पाणी जमा झाले आहे. त्यामुळे तेथील नागरिकांना एक ते दीड फूट पाण्यातून जावे लागत आहे. येथील घरांमध्ये आणि दुकानांमध्ये पाणी शिरले आहे. नागरिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. तसेच या परिसरात सत्कर्म बालक आश्रम आहे. या आश्रमात सुद्धा पाणी शिरले आहे. त्यामुळे येथील मुले ही दुसरीकडे हलविण्यात आली आहेत.
दरम्यान, बदलापूर शहरातील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. याकडे पालिका आणि प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने ‘लाडका खड्डा’ असे उपरोधिक बॅनर लावले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात हे खड्डे पडले असल्यामुळे त्यांचं नाव ‘लाडका खड्डा’ ठेवल्याचं राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष अविनाश देशमुख यांनी सांगितलं आहे.
सध्या राज्यात लाडकी बहीण आणि लाडका भाऊ योजनेची मोठी चर्चा आहे. एकीकडे सरकार अशा योजना आणत असताना मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात मात्र नागरिकांना चांगले रस्ते पुरविण्याकडे सरकारचं दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे सरकारचं आणि पालिका प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने ‘लाडका खड्डा’ असे बॅनर्स खड्ड्यांच्या बाजूला लावले आहेत. जिल्हा उपाध्यक्ष अविनाश देशमुख यांनी हे बॅनर्स लावले आहेत. आता तरी बदलापूर शहरातले खड्डे बुजवले जातात का? हे या निमित्ताने पाहणं गरजेचं ठरणार आहे.