एका बरणीत लाल मुंग्या आणि काळा मुंग्या एकत्र ठेवा, त्या शांततेने राहतात. पण कुणीतरी येतो आणि ती बरणी हलवून निघून जातो. त्यानंतर मात्र या मुंग्या एकमेकांशी भांडायला लागतात, असं म्हणत ही बरणी हलवणाऱ्यांपासून आपण सावध राहिलं पाहिजे, असा टोला भाजपचे माजी खासदार आणि माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी बदलापूरच्या आगरी महोत्सवात लगावला. त्यांचा हा टोला नेमका कुणाला उद्देशून होता? यावरून आता चर्चा सुरू झाली आहे. कपिल पाटील यांनी मात्र हे वक्तव्य कुणालाही उद्देशून नव्हतं, असं स्पष्टीकरणही दिलं आहे.
कपिल पाटील यांच्या वक्तव्याचा अर्थ काढायचा झाल्यास, लाल मुंग्या आणि काळ्या मुंग्या म्हणजे महायुतीतील शिवसेना आणि भाजपा हे दोन पक्ष असून नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना बदलापूर शहरप्रमुख वामन म्हात्रे आणि भाजपाचे स्थानिक नेते यांच्यात झालेल्या समाज-गैरसमजांच्या पार्श्वभूमीवर पाटील यांनी हे वक्तव्य केलं असावं, असा तर्क सध्या लावला जातोय. पण मग महायुतीची ही बरणी नेमकी कुणी हलवली? हे मात्र कपिल पाटलांनी सांगितलेलं नाही.
कपिल पाटील हे भाजपचे भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार आहेत. ते 2014 आणि 2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या तिकीटावर खासदार म्हणून निवडून आले होते. त्यांच्या कामांवर खूश होत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2021 मध्ये त्यांना केंद्रीय पंचायत राज्यमंत्रीपदाची संधी दिली होती. पण असं असलं तरी 2024 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार सुरेश उर्फ बाळ्या मामा म्हात्रे यांनी कपिल पाटील यांचा पराभव केला होता.