देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्र्यांच्या ठाण्याच्या निवासस्थानी, विरोधी पक्षांच्या गोटातही हालचाली, महाराष्ट्राच्या राजकारणात घडामोडीच घडामोडी

| Updated on: Jul 13, 2023 | 11:59 PM

महाराष्ट्राच्या राजकारणात पडद्यामागे अनेक घडामोडी घडत आहेत. आगामी पावसाळी अधिवेशनाच्या आधी अनेक गोष्टी समोर येण्याची शक्यता आहे. त्यासाठीच पडद्यामागील हालचालींना वेग आल्याची चर्चा आहे.

देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्र्यांच्या ठाण्याच्या निवासस्थानी, विरोधी पक्षांच्या गोटातही हालचाली, महाराष्ट्राच्या राजकारणात घडामोडीच घडामोडी
Follow us on

नंदकिशोर गावडे, Tv9 मराठी, ठाणे : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील निवासस्थानी दाखल झाले आहेत. फडणवीस रात्री इतक्या उशिरा मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी दाखल झाल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. फडणवीस यांच्या भेटीचं कारण सध्या तरी समजू शकलेलं नाही. पण राज्यात मंत्रिमंडळाचा विस्ताराचा आणि खातेवाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. त्यासाठी वरिष्ठ पातळीवर सातत्याने बैठकांचं सत्र सुरु आहे. एकीकडे मंत्रिमंडळाचा फॉर्म्युला ठरल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहेत. तसेच खातेवाटप उद्या जाहीर होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. असं असताना आज रात्री फडणवीस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील निवासस्थानी दाखल झाले आहेत.

गेल्या दहा दिवसांपासून मंत्रिमंडळ विस्तार आणि खातेवाटप विषयी वेगवेगळ्या बातम्या येत आहेत. सातत्याने बैठका होत आहेत. दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मुंबईतील ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी बैठक पार पडली. या बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते. विशेष म्हणजे त्याआधी देखील या बैठका पार पडल्या होत्या.

याशिवाय आजदेखील बैठकांचं संत्र सुरुच होतं. शिंदे, फडणवीस आणि अजित पवार यांची आज सकाळीसुद्धा ‘वर्षा’वर बैठक पार पडलेली. त्यानंतर अजित पवार यांनी फडणवीस यांच्या निवासस्थानी जावून भेट घेतली होती. त्यावेळी दोघांमध्ये चर्चा झाली होती. त्यानंतर आता रात्री उशिरा फडणवीस आणि शिंदे यांच्यात बैठक पार पडली.

हे सुद्धा वाचा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आज ठाण्यात कार्यक्रम होता. हा कार्यक्रम संपल्यानंतर ते ठाण्यातील निवासस्थानी आले होते. तर भाजपचं आज भिवंडीत एक दिवसीय शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं. या कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस यांचं धडाकेबाज भाषण झालं. त्यानंतर भाजपच्या कोअर कमिटीची तीन तास बैठक चालली. या बैठक आटोपल्यानंतर फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यातील निवासस्थानी भेट घेतली.

विरोधी पक्षांच्या गोटातही जोरदार हालचाली

विशेष म्हणजे एकीकडे सत्ताधाऱ्यांच्या गोटात मंत्रिमंडळाच्या विस्तार आणि खातेवाटपारुन सातत्याने खलबतं सुरु असताना तिकडे विरोधी पक्षांच्या गोटातही जोरदार हालचाली सुरु असल्याची माहिती मिळत आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना फोन केल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

यावेळी मल्लिकार्जुन खर्गेंनी विधानसभेचं विरोधी पक्षनेतेपद काँग्रेसकडे असावं, अशी मागणी शरद पवार यांच्याकडे केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. याशिवाय काँग्रसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले उद्या दिल्लीत होणाऱ्या बैठकीसाठी नागपूरहून रवाना होणार आहेत. दिल्लीत उद्या विरोधी पक्षनेता ठरवला जाणार असल्याची माहिती मिळत आहे.