ठाणे : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पुन्हा एकदा ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यात 2019 मध्ये झालेल्या बैठकीचा उल्लेख केला. उद्धव ठाकरे यांनी दोन दिवसांपूर्वी पोहरादेवीची शपथ घेऊन भाजपसोबत मुख्यमंत्रीपदाचा फॉर्म्युला ठरला होता, असं म्हणाले. त्याला आज देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिलं. भाजपचं आज भिवंडीत एकदिवसीय शिबिर आयोजित करण्यात आलेलं. यावेळी देवेंद्रे फडणवीस यांनी 2019 च्या विधानसभा निवडणुकीआधी उद्धव ठाकरे यांच्या ‘मातोश्री’ निवासस्थानी अमित शाह आणि उद्धव ठाकरे यांच्यात बंद दाराआड बैठकीत काय चर्चा झाली याबाबत सविस्तर माहिती दिली.
“बाळासाहेबांच्या खोलीबद्दल ते वारंवार सांगतात, त्याच खोलीमध्ये अमित शाह आणि उद्धव ठाकरे यांची बैठक झाली. मला त्या ठिकाणी बोलावलं. ते त्याठिकाणी बसले. मला त्यांनी आधीच सांगितलं होतं की, मला काही गोष्टी बोलायच्या आहेत. काही गोष्टी मनात आहेत त्या बोलायच्या आहेत. मी म्हटलं नक्की बोला”, असं देवेंद्र फडणवीस यांनी आज सांगितलं.
“मी अमित शाह यांना सांगितलं होतं. ते त्या खोलीत बसले. दहा-पंधरा मिनिटं बसले असतील. त्यानंतर मला बोलावलं. म्हणाले, आता सगळ्या गोष्टी दूर झालेल्या आहेत. आता आम्ही दोघांनी असं ठरवलं आहे की, पत्रकार परिषदेत तू एकट्यानेच बोलायचं, आम्ही काही बोलणार नाहीत. प्रश्नोत्तरं नको. मग पत्रकार परिषदेत काय बोलायचं? याची रिअलसल झाली”, असं फडणवीसांनी सांगितलं.
“मी मराठीत बोलून दाखवलं, मग मी ते हिंदीत बोलून दाखवलं. मग वहिणी पुन्हा आल्या. उद्धवजी म्हणाले, वहिणींसमोर बोलून दाखवा. नाही, अशा गोष्टी सांगायच्या नसतात. पण मला सांगायची वेळ आली आहे. मी आजपर्यंत बोललो नाही. मी पुन्हा एकदा बोलून दाखवलं आणि तंतोतंत तेच त्या ठिकाणी बोललो”, असा किस्सा देवेंद्र फडणवीस यांनी सांगितला.
“मी आजही सांगतो की, उद्धव ठाकरे यांचे शब्द असे होते की, बघा, मी खूप टोकाचं बोललोय. त्यामुळे मी यू-टर्न घेतोय. आमचा फेस सेम असायला हवा, असं तुम्ही बोला. त्यामुळे मी अतिशय तोलामोलाच्या शब्दात बोललो आणि पत्रकार परिषद घेतली. त्यानंतर अनेक सभांमध्ये देवेंद्र फडणवीस यंच्या नेतृत्वात निवडणूक लढतोय, आपल्या देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री हवाय, असं इतक्या वेळेला सांगितलं आणि निवडणूक झाल्यानंतर नंबर गेम होऊ शकतो हे समजलं आणि त्यांनी आम्हाला मुख्यमंत्रीपद हवं, असं सांगितलं”, असं देवेंद्र फडणवीस आज त्यांच्या भाषणात म्हणाले.