कल्याण : खासदार श्रीकांत शिंदे यांनी कल्याण डोबिंवलीत भाजप नेत्यांनी घेतलेल्या ठरावावर नाराजी व्यक्त केलीय. युतीत कुणीही मिठाचा खडा टाकू नये, असं श्रीकांत शिंदे स्पष्ट म्हणाले आहेत. तसेच युतीसाठी आपण खासदारकीचा राजीनामा द्यायला तयार असल्याचं वक्तव्य श्रीकांत शिंदे यांनी केलं आहे. श्रीकांत शिंदे यांची भूमिका समोर आल्यानंतर भाजप आणि शिवसेनेतील पहिला मोठा वाद चव्हाट्यावर आला आहे. विशेष म्हणजे श्रीकांत शिंदे यांच्या वादावर आता भाजप नेते रवींद्र चव्हाण यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. “भाजप ही कार्यकर्त्यांची संघटना आहे. कार्यकर्त्यांची मतं पक्ष ऐकतो. कार्यकर्त्यांची मतं पक्षाचे वरिष्ठ ऐकतील”, असं रवींद्र चव्हाण यांनी म्हटलं आहे. त्यामुळे हा वाद आणखी कुठपर्यंत जातो, ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
कल्याण डोंबिवलीच्या मानपाडा पोलीस ठाण्यातील एका पोलीस अधिकाऱ्याच्या बदीवरुन हा वाद उफाळला आहे. या पोलीस अधिकाऱ्याची बदली करण्यात यावी, अशी मागणी स्थानिक भाजप नेत्यांची आहे. विशेष म्हणजे त्यासाठी भाजप नेते चांगलेच आक्रमक झाले आहेत. भाजप नेत्यांनी संबंधित पोलीस अधिकाऱ्याची बदली होत नाही तोपर्यंत शिवसेनेला कल्याणमध्ये मदन न करण्याचा ठराव मंजूर केलाय. विशेष म्हणजे मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत हा ठराव झालाय. त्यामुळे श्रीकांत शिंदे यांनी भूमिका मांडत नाराजी व्यक्त केली. त्यावर आता रवींद्र चव्हाण यांनी भूमिका मांडली.
“त्या पद्धतीचा निर्णय कार्यकर्त्यांनी त्या भागामध्ये घेतला आहे. तो निर्णय त्यांनी ठरवलाय. तो कदाचित त्यांच्या मताला पटत असेल. भारतीय जनता पक्ष हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. कार्यकर्त्यांच्या मनामध्ये काय? याबाबत त्यांनी व्यक्त होणं, हे फक्त भारतीय जनता पक्षात होतं. त्यांनी ते व्यक्त केलंय, असं माझं स्वत:चं मत आहे. त्यामध्ये अधिकची माहिती वरिष्ठांना नक्की देण्याचं काम आम्ही करु”, अशी प्रतिक्रिया रवींद्र चव्हाण यांनी दिली.
“श्रीकांत शिंदे भाजप कार्यकर्त्यांबद्दल बोलले आहेत. त्यामुळे भाजप कार्यकर्त्यांबरोबर त्या त्या ठिकाणी असलेले लोकल नेत्यांशी चर्चा करतील. संघटना तिथले कार्यकर्ते, पदाधिकारी आणि वरिष्ठ यांचा विचार घेऊन आमचे नेते देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चा करतील”, असं रवींद्र चव्हाण म्हणाले आहेत.
रवींद्र चव्हाण यांच्या या प्रतिक्रियेनंतर आता हा वाद मिटेल की आणखी पुढे वाढेल? असा प्रश्न निर्माण झाला आहे. भाजपकडून कल्याण लोकसभेवर याआधीदेखील दावा करण्यात आलाय. त्यामुळे आगामी काळात नेमक्या काय घडामोडी घडतात ते पाहणं महत्त्वाचं ठरेल.