सुनील जाधव, Tv9 मराठी, कल्याण | 13 जानेवारी 2024 : ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज कल्याण लोकसभा मतदारसंघाचा दौरा केला. या मतदारसंघात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव श्रीकांत शिंदे हे खासदार आहेत. या मतदारसंघात मधल्याकाळात सत्ताधारी शिवसेना आणि भाजपमध्ये अनेक मतभेद झाले. ते मतभेद मिटवण्याचं कामही महायुतीच्या ज्येष्ठ नेत्यांकडून झालं. पण तरीही कल्याण लोकसभेत महायुतीतली धुसफूस कमी झालेली हे स्पष्ट होतंय. कारण कल्याणचे भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांनी आज ‘टीव्ही 9 मराठी’ला प्रतिक्रिया देताना श्रीकांत शिंदे यांच्याबद्दलची नाराजी व्यक्त केली आहे. तसेच कल्याण लोकसभेचा उमेदवार भाजपचेच पक्षश्रेष्ठी ठरवणार, असं गणपत गायकवाड म्हणाले आहेत.
“लोकसभेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचाच उमेदवार निवडून येईल. भारतीय जनता पक्षाच्यासोबत जो उमेदवार असेल तो आमचा भारतीय जनता पार्टीचा उमेदवार निवडून येईल. उमेदवार भाजपचा असेल की खासदार श्रीकांत शिंदे असतील हे पक्षश्रेष्ठ ठरवतील. मात्र आमचा पक्ष ज्याला तिकीट देईल, ज्याला मान्यता देईल, त्याचं आम्ही काम करू. इतर कोणीही कितीही ताकद लावली तरी या ठिकाणी भारतीय जनता पक्षाशिवाय दुसरा उमेदवार निवडून येणार नाही. श्रीकांत शिंदे जिथे उभे राहतील तिकडून निवडून येतील. मात्र या मतदारसंघात तिकीट कोणाला द्यायचं याबद्दल आमचे जेष्ठ नेते ठरवतील. त्यावेळेला जो नेता जो उमेदवार असेल त्याला आम्ही निवडून आणू आणि शंभर टक्के तो उमेदवार निवडून येणार”, असं मोठं वक्तव्य गणपत गायकवाड यांनी केलं.
“कल्याण लोकसभा हा भाजपचा बालेकिल्ला होता. मात्र गेल्या 25 वर्षात भाजपची पीछेहाट होत गेली. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले. त्यावेळेला त्यांनी आम्हाला ताकद दिली. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यामुळे आमचा बालेकिल्ला पुन्हा मजबूत झालाय. या ठिकाणी जो उमेदवार असेल तो 100 टक्के निवडून येणार आणि तो पण आमचाच उमेदवार असेल. यांच्याकडे उमेदवार नाही म्हणून हे पुढे जाऊ शकत नाहीत”, अशी टीका गणपत गायकवाड यांनी केली.
“मी तीन वेळा या परिसरात आमदार होऊन शिकत-शिकत पुढे गेलेलो आहे. मला खासदारकीची इच्छा नाही. मी आमदार असताना ज्या गोष्टी शिकलो या माझ्या पुढच्या दोन टप्प्यांसाठी, विकासासाठी उपयोगी पडणार आहेत. मी खासदार बनलो तर पुन्हा हा मतदारसंघ पाठीमागे जाईल, मला पुन्हा खासदारकीचा अभ्यास करावा लागेल. त्यामुळे मला खासदारकीची इच्छा नाही आणि मी त्या रेसमध्ये नाही”, असं गणपत गायकवाड यांनी स्पष्ट केलं.
“खासदार श्रीकांत शिंदे यांच्याबद्दल आमदारांमध्ये नक्कीच नाराजी आहे. आमचा अधिकार राज्य शासनाच्या निधीमध्ये प्रत्येक ठिकाणी आहे. विकासकामांच्या उद्घाटनांच्या ठिकाणी स्थानिक लोकप्रतिनिधी म्हणून, आमदार म्हणून आमचं त्या बोर्डवर नाव नसतं”, अशी नाराजी गणपत गायकवाड यांनी व्यक्त केलीय. “ग्रामीण भागातील योजना, राज्य शासनाच्या विशेष निधी, याबाबतच्या उद्घाटनाचं लोकार्पण सरकारी अधिकाऱ्यांच्या हस्ते न करता शिंदे गटाचे लोकप्रतिनिधी जाऊन उद्घाटन करतात”, अशी खंत गणपत गायकवाड यांनी व्यक्त केली.
“स्थानिक नेत्यांना डावलून त्यांनी उद्घाटन केलं हे चुकीच आहे. त्यांनी उद्घाटन केलं. पण त्या कामात स्थानिक आमदारांचाही वाटा असतो. कारण स्थानिक आमदारांनी त्या ठिकाणी पत्र व्यवहार केलेला असतो, पाठपुरावा केलेला असतो. आमचं नाव येत नाही यामुळे आम्हाला नाराजी वाटते. जोपर्यंत ती सुधारणा होत नाही तोपर्यंत ही नाराजी राहणारच”, अशी स्पष्ट भूमिका गणपत गायकवाड यांनी व्यक्त केलीय