कल्याण : जुन्या बांधकामावर कारवाई केल्यामुळे शिवसेनेच्या माजी नगरसेवकाने पालिका अधिकाऱ्याच्या कानशिलात लगावल्याची घटना 17 नोव्हेंबरला घडली. या घटनेनंतर आता वेगवेगळ्या प्रतिक्रिया यायला सुरवात झालीय. भाजपचे आमदार रविंद्र चव्हाण यांनी शिवसेनेच्या माजी नगरसेवकाची पाठराखण केली आहे. त्यांनी माजी नगरसेवक कोट यांची भूमिका हिंदुत्व आणि मंदिरासाठी फार महत्त्वाची असल्याचं म्हटलंय. मंदिरावरील कथित कारवाईदरम्यान कोट यांनी सहायक आयुक्तांना मारहाण केली होती.
भाजप आमदार रविंद्र चव्हाण यांनी मुकुंद कोट यांना पाठिंबा दर्शविला आहे. कोट यांनी कल्याण येथे मंदिराच्या बांधकामावर कारवाई होत असताना महापालिकेच्या सहायक आयुक्तांना मारहाण केली होती. या प्रकरणानंतर कोट यांची भूमिका हिंदुत्व आणि मंदिरासाठी फार महत्त्वाची आहे. मुकुंद कोट शिवसेनेचे माजी नगरसेवक असले तरी आमचा त्यांना पाठिंबा आहे, असे रविंद्र चव्हाण यांनी म्हटलंय.
मुकुंद कोट यांनी 17 नोव्हेंबर रोजी सहाय्यक आयुक्त राजेश सावंत यांच्या कानशिलात लगावली होती. कल्याण पश्चिम येथील मोहने परिसरात एका बांधकामावर कारवाई करण्यासाठी कल्याण डोंबिवली महापालिकेचे प्रभाग अधिकारी राजेश सावंत पोहोचले होते. त्यांनी कारवाई सुरु करण्याआधीच स्थानिक गावकऱ्यांनी विरोध दर्शविला होता. तरीदेखील महापालिकेच्या पथकाने या बांधकामावर कारवाई केली. कारवाई करुन महापालिकेचे अधिकारी सावंत प्रभाग कार्यालयात परतले होते. या दरम्यान माजी नगरसेवक मुकुंद कोट आणि स्थानिक नागरिक कार्यालयात पोहोचले होते. यादरम्यान सावंत आणि कर्मचाऱ्यांसमोर कोट समर्थकांनी गोंधळ घातला होता. हा वाद नंतर विकोपाला गेल्यामुळे मुकुंद कोट यांनी सावंत यांच्या कानशिलात लगावली होती. त्याचा व्हीडीओ समोर आला होता.
दरम्यान, स्थानिकांच्या मते ज्या ठिकाणी महापालिकेने कारवाई केली होती; त्याठीकाणी जुने गावदेवीचे मंदिर होते. ते मंदिर जीर्ण झाले होते. स्थानिक गावकरी लोकवर्गणीतून मंदिराचा जिर्णोद्धार करणार होते. त्याठिकाणी महापालिकेचे अधिकारी कारवाईसाठी पोहोचले होते. त्यामुळे ही घटना घडली होती. तर दुसरीकडे ही घटना घडल्यानंतर त्याठीकाणी मंदिर होते याची माहीती आमच्याकडे नव्हती. त्या ठिकाणी जोते बांधण्यात आले होते. ते देखील रस्त्यात बेकायदेशीरपणे बांधले होते. त्यामुळे आम्ही कारवाई केली, असे स्पष्टीकरण प्रभाग अधिकारी सावंत यांनी दिले होते.
इतर बातम्या :
गडचिरोली लोकसभा : काँग्रेस आणि भाजपाला अंतर्गत गटबाजीचं ग्रहण