Devendra Fadnavis : फडणवीस हेच मुख्यमंत्री हवे, मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यातच आवाज घुमला; महायुतीत काय चाललंय?

| Updated on: Oct 18, 2023 | 10:50 AM

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची महाविजय 2024 संकल्प यात्रा सुरू आहे. बावनकुळे या यात्रेच्या निमित्ताने संपूर्ण राज्यात फिरत आहेत. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीचा आढावा घेत कार्यकर्त्यांच्या मनातील भावनाही जाणून घेत आहेत.

Devendra Fadnavis : फडणवीस हेच मुख्यमंत्री हवे, मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यातच आवाज घुमला; महायुतीत काय चाललंय?
devendra fadnavis
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

गणेश थोरात, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, ठाणे | 18 ऑक्टोबर 2023 : एकनाथ शिंदे हे महायुतीचे मुख्यमंत्री असले तरी महायुतीत मुख्यमंत्रीपदासाठी रस्सीखेच सुरू आहे. अजित पवार यांना मुख्यमंत्री करण्यासाठी अजितदादा गटाने कंबर कसली आहे. तर देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री करावं म्हणून भाजपही कामाला लागली आहे. तर, शिंदेच हे पुढचे मुख्यमंत्री कसे राहतील यावर शिंदे गटाने भर दिला आहे. मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यातच देवेंद्र फडणवीस हेच आगामी मुख्यमंत्री असावेत अशी गर्जनाच भाजप कार्यकर्त्यांनी केली आहे. त्यामुळे महायुतीत चाललंय काय? असा सवाल केला जात आहे.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वात महाविजय 2024 संकल्प दौऱ्याचं आयोजन करण्यात आलं आहे. या निमित्ताने बावनकुळे राज्यभर दौरा करत आहेत. ते काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यात आले होते. यावेळी त्यांनी लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेतला. कार्यकर्त्यांशी संवाद साधला. चौक सभाही घेतल्या. नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी कामाला लागण्याचे आदेशही त्यांनी यावेळी दिला.

अन् एकमुखाने सर्वजण म्हणाले…

ठाण्यातील गडकरी रंगायतनमध्ये झालेल्या भाजप कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात चंद्रशेखर बावनकुळे यांनी कार्यकर्त्यांना एक महत्त्वाचा सवाल केला. 2024मध्ये तुम्हाला मुख्यमंत्री कोण हवा आहे? असा सवाल बावनकुळे यांनी केला. त्यावेळी खच्चून भरलेल्या सभागृहातून एकमुखाने देवेंद्र फडणवीस… देवेंद्र फडणवीस… असा पुकारा करण्यात आला. फडणवीसच आम्हाला मुख्यमंत्री हवेत, असं सर्वांनीच एकमुखाने सांगितल्यानंतर बावनकुळे यांनी मग कामाला लागा, असे आदेशच कार्यकर्त्यांना दिल्याचं सांगितलं जातं. बावनकुळे यांनी थेट कार्यकर्त्यांच्या मनातील भावना जाणून घेतल्याने राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आलं आहे.

कामाला लागा

चंद्रशेखर बावनकुळे केवळ एवढ्यावरच थांबले नसून तुमच्या मनात जो मुख्यमंत्री हवा आहे, त्यासाठी आतापासून कामाला लागा, असे आवाहनही त्यांनी कार्यकत्यांना केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यात येऊनच बावनकुळे यांनी कार्यकर्त्यांना हे आवाहन करून एक प्रकारे शिंदे गटावर दबाव टाकला असल्याचं सांगितलं जात आहे.

मन की बात जाणली

भाजपाच्या महाविजय 2024 अभियानांतर्गत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे राज्यातील 48 लोकसभा मतदारसंघांचा दौरा करत आहेत. त्यांनी मंगळवारी ठाणे लोकसभा मतदार संघाचा दौरा केला. या दौऱ्यादरम्यान त्यांनी ठाणे शहरातील गडकरी रंगायतन नाट्यगृह येथे बैठक घेतली. यावेळी त्यांनी ठाणे शहर, कोपरी-पाचपाखाडी, ओवळा-माजिवडा आणि मिरा-भाईंदर विधानसभा मतदारसंघातील भाजपाने नियुक्त केलेल्या एक हजार कार्यकर्त्यांसोबत संवाद साधला. कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केल्यानंतर त्यांनी कार्यकर्त्यांची ‘मन की बात’ जाणून घेतली.