महायुतीमध्ये नाशिकसोबतच ठाण्याच्या जागेबाबतचा सस्पेन्स कायम आहे. विशेष म्हणजे या दोन्ही लोकसभा मतदारसंघांमध्ये 20 दिवसांनी मतदान होणार आहे. त्यामुळे आता महायुतीच्या नेत्यांकडून या दोन्ही जागांचा तिढा सोडण्यासाठी जोरदार प्रयत्न केले जात आहे. ठाण्याची जागा शिवसेनेला सुटण्याची शक्यता आहे, अशी राजकीय वर्तुळात गेल्या काही दिवसांपासून चर्चा आहे. विशेष म्हणजे शिवसेनेचे नेते प्रताप सरनाईक आणि रवींद्र फाटक या दोन्ही नेत्यांचं नाव ठाणे लोकसभेसाठी चर्चेत आहे. असं असताना एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. ठाणे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून आज नामनिर्देशन पत्रांचं वाटप करण्यात आलं आहे. यामध्ये भाजपकडून एक नामनिर्देशन पत्र घेण्यात आलं आहे. त्यामुळे ठाण्याची जागा आता भाजप लढणार का? असा प्रश्न या निमित्ताने निर्माण झाला आहे.
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी आज विविध पक्षांच्या 5 उमेदवारांनी तर एका अपक्ष उमेदवाराने आपले नामनिर्देशन अर्ज ठाणे लोकसभा मतदारसंघ निवडणूक निर्णय अधिकारी तथा अप्पर जिल्हाधिकारी मनिषा जायभाये यांच्याकडे उमेदवारी सादर केले. तर आज दुपारी तीन वाजेपर्यंत पाच नामनिर्देशन पत्रांचे वाटप करण्यात आले. आज दाखल केलेल्या अर्जामध्ये सरदार वल्लभभाई पटेल पार्टीचे उमेदवार सुभाषचंद्र झा, भारतीय राजनितीक विकल्प पक्षाचे उमेदवार सुरेंद्रकुमार के जैन, आधार समाज पार्टीच्या उमेदवार अर्चना दिनकर गायकवाड, बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टीचे उमेदवार राहूल जगदीशसिंघ मेहरोलिया, बहुजन मुक्ती पार्टीचे उमेदवार चंद्रकांत विठ्ठल सोनावणे, डॉ पियूष के. सक्सेना यांनी ठाणे लोकसभा मतदारसंघांच्या निवडणूक निर्णय अधिकारी तथा अप्पर जिल्हाधिकारी मनिषा जायभाये यांच्याकडे उमेदवारी अर्ज दाखल केले.
विशेष म्हणजे आज दुपारी तीन वाजेपर्यंत पाच नामनिर्देशन पत्रांचे वाटप करण्यात आले. यामध्ये वंचित बहुजन आघाडीडून 2, आझाद समाज पार्टी आणि भाजपकडून प्रत्येकी 1 नामनिर्देशन पत्र घेण्यात आलं. तसेच एका अपक्ष उमेदवारानेदेखील नामनिर्देशन पत्र घेतल्याची माहिती प्रशासनाकडून प्रेसनोटद्वारे देण्यात आली आहे.
भाजपकडून ठाण्याच्या जागेवर अनेकदा दावा करण्यात आला आहे. पण ही जागा गेल्या निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार राजन विचारे जिंकले होते. पण ते यावेळी ठाकरे गटाकडून लढत आहेत. तसं असलं तरी शिवसेनेचा या जागेवर पहिल्या दिवसापासून दावा आहे. दुसरीकडे भाजपचाही या मतदारसंघावर दावा आहे. त्यामुळे ठाण्याच्या जागेचा तिढा अद्याप सुटलेला नाही.
ठाणे लोकसभा मतदारसंघाबाबत वेगवेगळ्या चर्चा सुरु असताना आज शिवसेनेच्या दोन बड्या नेत्यांनी एकाच गाडीतून प्रवास केला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलं आहे. शिवसेना नेते रवींद्र फाटक आणि प्रताप सरनाईक यांनी आज एकाच गाडीतून प्रवास केला आहे. दोन्ही नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी निघाले होते. या दोन्ही नेत्यांची मुख्यमंत्र्यांसोबतची बैठकही पार पडली आहे. दुसरीकडे भाजपकडून उमेदवारीसाठीचं नामनिर्देशन पत्र घेण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे ठाण्याच्या जागेबाबतचा सस्पेन्स आणखी वाढला आहे.