कल्याणमध्ये भीषण अपघात, ब्रेकफेल झालेली बस मर्सिडीजवर कोसळली, चक्काचूर… पाहा VIDEO

| Updated on: Apr 27, 2023 | 10:16 PM

गोदरेज हिल परिसरात सोसायटीच्या रहिवाशांसाठी खासगी ट्रॅव्हल्सकडून बस चालवली जाते. दरम्यान आज संध्याकाळी गोदरेज हिलवरून खाली उतरत असताना या मार्गावर असणाऱ्या एका वळणावर हा अपघात घडल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.

कल्याणमध्ये भीषण अपघात, ब्रेकफेल झालेली बस मर्सिडीजवर कोसळली, चक्काचूर... पाहा VIDEO
Follow us on

ठाणे : कल्याणमध्ये एक भीषण अपघात झालाय. बसचा ब्रेक फेल होऊन ती सोसायटीची संरक्षक भिंत तोडून थेट सोसायटीच्या पार्किंगमध्ये गाड्यांवर कोसळल्याची धक्कादायक घटना घडलीय. संबंधित घटना ही कल्याण पश्चिमेच्या गोदरेज हील परिसरात घडली आहे. या दुर्घटनेत बसचालक किरकोळ जखमी झालाय. सुदैवाने यामध्ये कोणाला दुखापत झाली नाहीय. पण मर्सिडीज गाडीचं प्रचंड नुकसान झालंय. बसचे ब्रेक फेल झाल्याने हा अपघात झाला. तसेच सोसायटीतील आणखी 2-3 गाड्यांचे नुकसान झाले आहे.

गोदरेज हिल परिसरात सोसायटीच्या रहिवाशांसाठी खासगी ट्रॅव्हल्सकडून बस चालवली जाते. दरम्यान आज संध्याकाळी गोदरेज हिलवरून खाली उतरत असताना या मार्गावर असणाऱ्या एका वळणावर हा अपघात घडल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.

हे सुद्धा वाचा

परिसरात खळबळ

खाली येत असताना अचानक बसचे नियंत्रण सुटले आणि खाली असणाऱ्या मलबारी सोसायटीची संरक्षक भिंत तोडून ही बस तिथल्या गाड्यांवर कोसळली. सध्या घटनास्थळी खडकपाडा पोलीस दाखल झाले आहेत. पोलीस नेमकं काय कारण आहे याचा शोध घेत आहे. दरम्यान, संबंधित घटना घडल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. ही घटनाच अतिशय चित्तथरारक अशी होती. घटनेत कुणाचा जीव तर गेला नाही ना? असा विचार घटना पाहणाऱ्या प्रत्यदर्शींना मनात सर्वात आधी आला.

घटनेमुळे अनेकांची धाकधूक वाढली. यावेळी अनेक जण घटनास्थळी मदतकार्यासाठी तातडीने पुढे आले. पण थोड्यावेळाने अपघातात जीवितहानी झाली नसल्याचं स्पष्ट झालं. त्यामुळे स्थानिकांनी सुटकेचा श्वास सोडला. पण सोसायटीत पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या काही गाड्यांचं अतोनात नुकसान झालंय.  मर्सिडीजच्या पुढच्या भागाचा तर अक्षरश: चक्काचूर झालाय. त्यामुळे आता त्याची भरपाई होईल? हा देखील एक महत्त्वाचा मुद्दा आहे. संबंधित घटनेचे व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. हे व्हिडीओ पाहिल्यावर अनेकांकडून चिंता व्यक्त केली जात आहे.

पुणे मुंबई द्रुतगती मार्गावरही विचित्र अपघात

राज्यात सध्या अपघातांची मालिकाच सुरु आहे. विशेष म्हणजे एक दिवसापूर्वीच पुणे मुंबई द्रुतगती मार्गावर विचित्र अपघात झाला होता. एकूण 11 वाहनं एकमेकांना धडकली आहेत. या अपघातानंतर एक चारचाकी तर अक्षरशः दुसऱ्या वाहनावर उभी झालेली बघायला मिळालेली. खोपोली एक्झिटजवळ हा अपघात झाला. सुदैवाने यात कोणती जीवितहानी झाली नाही. काही जखमींना रुग्णालयात भरती करण्यात आलेलं. या अपघातानंतर काही काळासाठी वाहतूक ठप्प झाली होती. अपघातात एकूण अकरा वाहनं एकमेकांना धडकली होती.