ठाणे: ठाण्यात (thane) सोमवारी रात्री एक अत्यंत मोठा थरार पाहायला मिळाला. त्यामुळे अनेकांच्या काळजाचा ठोका चुकला. गेल्या आठवड्यापासून पाऊस सुरू झाल्याने ठाण्यात अनेक ठिकाणी पाणीच पाणी साचले आहे. भर रस्त्यावरही पाणी आले आहे. त्यामुळे अनेकांना या पाण्यातूनच वाहने चालवावी लागत आहेत. त्यामुळे अनेक वाहनचालकांचे गाडी चालवताना अंदाज चुकत आहेत. ठाण्याच्या फडकेपाडा (phadkepada) तलाव परिसरात अशीच एक घटना सोमवारी रात्री 11च्या सुमारास घडली. पावसामुळे हा तलाव दुथडी भरून वाहू लागला आहे. त्यामुळे रस्ता कोणता आणि तलाव कोणता हे कळायला मार्ग नाही. सोमवारी रात्री या ठिकाणाहून एक कार जात होती. त्यावेळी पाण्याचा अंदाज चुकल्याने ही कार थेट फडके तलावात घुसली. ड्रायव्हरसहीत ही कार पाण्यात बुडाल्याने (Thane Car Sank) एकच हाहा:कार उडाला. या घटनेची माहिती मिळताच तात्काळ स्थानिकांनी धाव घेऊन मदतकार्य केलं आणि ड्राव्हरचा जीव वाचवला. निव्वळ दैव बलवत्तर होतं म्हणून हा ड्रायव्हर बचावल्याची चर्चा ठाण्यात सुरू आहे.
या दुर्घटनेत बचावलेल्या कारचालकाचे नाव युसुफ पठाण आहे. तो चेंबूर येथील रहिवासी आहे. ही कार मे. रजा एंटरप्राइजेस या कंपनीच्या मालकाची आहे. सोमवारी रात्री तो ठाण्यात खर्डी गावच्या फडकेपाडा येथून कारने जात होता. रात्री 11च्या सुमारास पाण्याचा अंदाज आला नाही. शिवाय या परिसरात तलाव असल्याचं त्याला माहीत नव्हतं. त्यामुळे पाणी थोडेच दिसल्याने त्याने पाण्यातून कार घुसवली. पण कार रस्त्यावरून न चालता थेट तलावात घुसली. त्यामुळे त्याला काय घडलं ते कळलंच नाही. तलावात कार घुसल्याने पाण्याचा मोठा फवारा उडाला आणि धप्पकन वाजल्याचा आवाज झाला. त्यामुळे तलावात काही तरी पडल्याचं स्थानिकांच्या लक्षात आले आणि त्यांनी मदतीसाठी धाव घेतली. एव्हाना ठाण्याच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या अधिकाऱ्यांनी आणि अग्निशमन दलाच्या जवानांनीही घटनास्थळी धाव घेऊन युसुफ पठाण याला सुखरुप बाहेर काढलं.
कार पाण्यात बुडाल्याचं अनेकांनी पाहिलं. त्यातील एका व्यक्तीने आपत्ती व्यवस्थापन विभागाला फोन केला. साहेब, दिवा येथील खर्डीगावाच्या फडकेपाडामध्ये कार बुडाली आहे. या कारमध्ये किती लोक आहेत हे माहीत नाही. त्यामुळे लवकर या आणि या लोकांना वाचवा, असं या व्यक्तीने आपत्ती व्यवस्थापन विभागाला कळवलं. हा फोन येताच आपत्ती व्यवस्थापन विभागाचे जवान तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन केंद्राचे जवान १-फायर वाहन, १-रेस्क्यू वाहनासह घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी आधी कार चालकाला वाचवलं. त्यानंतर रस्सीच्या सहाय्याने ही कार तलावातून बाहेर काढली. त्याचा व्हिडिओही व्हायरल झाला आहे. अंगावर शहारा आणणारा हा व्हिडिओ आहे.
दरम्यान, या कारचालकाला किरकोळ मार लागला. त्यामुळे त्याला रुग्णालयात नेण्यात आलं. त्याची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर त्याला रुग्णालयातून सोडून देण्यात आलं. नंतर, शीळ पोलिस कर्मचारी, आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी व अग्निशमन केंद्राच्या कर्मचाऱ्यांनी या कार चालकाकडे त्याची कार ताब्यात दिली. तसेच याबाबतचा पंचनामाही करण्यात आला आहे.