भिवपुरी रोड | 4 जुलै 2023 : पाऊस नसतानाही सकाळी सकाळी चाकरमान्यांना मोठा फटका बसला आहे. भिवपुरी रेल्वे स्थानकाजवळच रेल्वे रुळाखाली मोठा खड्डा पडल्याने मुंबईकडे जाणाऱ्या लोकल थांबवण्यात आल्या होत्या. त्यानंतर हा खड्डा बुजवण्याचं काम युद्ध पातळीवर हाती घेण्यात आलं होतं. त्यामुळे मध्य रेल्वेची सेवा विस्कळीत झाली आहे. तब्बल 15 ते 20 मिनिटे लोकल उशिराने धावत आहेत. परिणामी मुंबईला कामावर जाणाऱ्या चाकरमान्यांचे प्रचंड हाल होत आहेत.
आज सकाळीच रेल्वे रुळाखाली हा भला मोठा खड्डा पडल्याची माहिती समोर आली. भिवपुरी रोड स्टेशनवरील हेडमास्तर ऑफिसजवळ रेल्वे रुळाला मोठा खड्डा पडला. रेल्वे रुळाचा खालीच हा खड्डा पडला. हा खड्डा आतमध्ये खूप खोल असल्याचं सांगितलं जात आहे. रेल्वे रुळाखाली मोठा खड्डा पडल्याचं सकाळी 7 वाजता लक्षात आलं. ही बाब लक्षात येताच रेल्वे प्रशासनाने युद्धपातळीवर खड्डा बुजवण्याचं काम सुरू केलं.
खड्डा पडल्याचं लक्षात आल्यानंतर दोन्ही मार्गावर वाहतूक ठप्प ठेवण्यात आली होती. अर्धा तास ही वाहतूक ठप्प ठेवण्यात आली. त्यामुळे कर्जतहून सीएसटीला जाणारी रेल्वे सेवा अर्धा तास बंद होती. त्यानंतर ही वाहतूक सुरळीत सुरू करण्यात आली. मात्र, 15 ते 20 मिनिटे लोकल अजूनही उशिराने धावत आहे.
लोकल सेवा उशिराने धावत असल्याने भिवपुरीपासून ते बदलापूर, उल्हासनगर, अंबरनाथ, कल्याण, डोंबिवली स्थानकांवर प्रवाशांची प्रचंड गर्दी झाली होती. बदलापूर स्थानकात तर प्रचंड गर्दी झाली होती. गर्दीतूनच प्रवाशांना जावं लागत होतं. सकाळी सकाळीच हाल झाल्याने प्रवासी चांगलेच वैतागले होते.
रेल्वेचा खोळंबा झाल्याने बदलापूरच्या प्रवाशांना एसटी स्टँड गाठलं. मुंबईला जाणारी एसटी पकडून प्रवास करणं काहींनी पसंत केलं. पण एसटीतही प्रचंड गर्दी झाली होती. त्यामुळे एसटीतून प्रवास करणंही कठिण होऊन बसलं होतं. रेल्वेतील गर्दीमुळे महिला प्रवाशांचे चांगलेच हाल झाले होते.
कर्जतहून मुंबईला येणारी लोकलसेवा आधी बंद होती. नंतर उशिराने सुरू झाली. त्यामुळे मुंबईहून कर्जतला जाणाऱ्या गाड्याही खोळंबल्या होत्या. अनेक गाड्या एकामागोमाग एक उभ्या होत्या. लोकल थांबल्याने स्टेशन जवळपास असल्याचा अंदाज घेऊन अनेकांनी पायी चालत जाण्यावर भर दिला.