डोंबिवली | 23 सप्टेंबर 2023 : डोंबिवली हे प्रचंड गर्दीचं स्टेशन. कधीही जा. डोंबिवलीमधून लोकलमध्ये चढताना दमछाक होतेच. कारण कर्जत आणि कसाऱ्यावरून लोकल खचाखच भरून येतात. त्यामुळे डोंबिवलीतून लोकल पकडणं नको नकोसं होतं. सकाळी आणि संध्याकाळी तर विचारूच नका. डोंबिवली स्थानकात पाय ठेवायलाही जागा नसते. असं असलं तरी आता डोंबिवलीकरांना भर गर्दीतही आता सिनेमा पाहता येणार आहे. त्यासाठी रेल्वेने मेगा प्लान तयार केला आहे.
डोंबिवली स्टेशनवर आता प्रवाशांना चित्रपट पाहता येणार आहे. मध्य रेल्वेने सिनेडोम उभारण्याचा निर्णय घेतला आहे. यात ग्राहकांची गर्दी, गेस्ट, जेवण, नाश्ता, कोल्ड ड्रिंक्स याची या सिने डोममध्ये सुविधा असणार आहे. याशिवाय या सिने डोममध्ये नवनवीन चित्रपट, माहितीपट प्रदर्शित करण्यासाठी एक संपूर्ण व्यवस्था असणार आहे. म्हणजे प्रवाशांना एकाच ठिकाणी अनेक सुविधांचा एकाच वेळी लाभ घेता येणार आहे. त्यासाठी मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाने निविदा मागविण्यास सुरुवात केली आहे.
मध्य रेल्वेने काही स्थानकावर प्री-फॅब्रिकेटेड सिने डोम उभारण्याचा निर्णय घेतला आहे. डोंबिवली, खोपोली, जुचंद्र आणि इगतपुरी स्थानाकंवर हा सिने डोम उभारण्यात येणार आहे. त्यासाठी रेल्वेने निविदा प्रक्रियाही सुरू केली आहे. त्यामुळे लवकरच प्रवाशांना या स्थानकांवर सिनेमा पाहता येणार आहे. त्यामुळे रेल्वेच्या मिळकतीत भरही पडणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं.
प्री- फॅब्रिकेटेड सिने डोम ही तात्पुरती व्यवस्था असून त्याला कायमस्वरूपी बांधकाम करण्यास परवानगी दिली जाणार नाही. कंत्राटदार स्वत:च सिने डोमचे व्यवस्थापन आणि ऑपरेटर करतील. 10 वर्षांच्या कालावधीसाठी डोंबिवली, खोपोली, जुचंद्र आणि इगतपुरी स्थानकांवर प्री-फॅब्रिकेटेड सिने डोम सेट अप आणि ऑपरेट करण्यासाठी ते नॉन-फेअर रेव्हेन्यू उत्पन्न मॉडेल अंतर्गत असणार आहे. या स्थानकात 5 हजार चौरस फूट जागेत डोमची निर्मिती होणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.
दरम्यान, ज्या संस्थांकडे या सिने डोमची जबाबदारी दिली जाईल, त्यांच्याकडून मध्य रेल्वे शुल्कापोटी लाखो रुपये वसूल करणार आहेत. त्यामुळे रेल्वेच्या तिजोरीत आयतीच मिळकत होणार आहे. सिने डोमच्या माध्यमातून रेल्वेला महसूलाचा एक मार्ग मिळाला असून त्याला प्रवासी प्रेक्षक कसा प्रतिसाद देतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.