ठाणे: ठाणे जिल्ह्यातील (thane) शहरी आणि ग्रामीण भागात कोरोना (corona) रुग्णांची संख्या वाढत आहे. या पार्श्वभूमीवर लसीकरणावर भर देण्यासाठी ग्रामीण भागामध्ये ‘मिशन हर घर दस्तक’ मोहिमेचा दुसरा टप्पा 1 जुलैपासून राबविण्यात येणार आहे. सुट्टीच्या दिवशी रेल्वे स्थानकांजवळ (railway station) लसीकरण सत्र आयोजित करून लसीकरणाचे प्रमाण वाढविण्याचे निर्देश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भाऊसाहेब दांगडे यांनी येथे दिले आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समिती सभागृहात कोरोना लसीकरणासाठीच्या जिल्हा कृती दलाची बैठक झाली. त्यावेळी डॉ. दांगडे यांनी जिल्ह्यातील लसीकरणाचा आढावा घेतला. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे, जिल्हा लसीकरण अधिकारी डॉ. अंजली चौधरी, तालुका आणि मनपा, नपा आरोग्य अधिकारी उपस्थित होते. यावेळी हे निर्देश देण्यात आले आहेत.
मिशन हर घर दस्तक -2 मोहिमेत 12 ते 14 आणि 15 ते 17 वयोगटातील लाभार्थ्यांच्या लसीकरणावर भर दिला जाणार आहे. शाळा सुरू झाल्यानंतर तेथे लसीकरण सत्र आयोजित करून लसीकरणाला गती देण्याचा प्रयत्न करण्यात येणार असल्याचे डॉ. चौधरी यांनी सांगितले. फ्रंट लाईन वर्कर आणि 60 वर्षांवरील नागरिकांना पुरक डोस (प्रिकॉशन डोस) देण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे.
ठाणे जिल्ह्यात कोरोना लसीकरणासाठी सध्या शासकीय आणि खासगी अशी एकूण 1021 लसीकरण केंद्र आहेत. आरोग्य विभागाच्या अहवालानुसार 13 जून अखेर संपूर्ण जिल्ह्यात पहिला डोस 70 लाख 30 हजार 950 (85 टक्के) तर दुसरा डोस 62 लाख 46 हजार (75 टक्के) नागरिकांनी घेतला आहे. 12 ते 14 वयोगटातील लाभार्थ्यंमध्ये पहिला डोस 1 लाख 41 हजार (44 टक्के) तर दुसरा डोस 75 हजार 270 (53 टक्के) असे लसीकरण झाले आहे.
जिल्ह्यातील ग्रामीण भागात लसीकरणाला गती देण्याची आवश्यकता आहे. तालुका आरोग्य अधिकाऱ्यांनी आपल्या कार्यक्षेत्रात शाळांमध्ये जास्तीत जास्त लसीकरण सत्र आयोजित करून 100 टक्के विद्यार्थ्यांचे लसीकरण करून घेण्याच्या सूचना डॉ. परगे यांनी दिल्या. लसीकरणा दरम्यान एखादी व्यक्ती संस्था अडथळा आणत असल्यास किंवा लसीकरणाविषयी गैरसमज पसरवित असल्यास त्यांच्या विरूद्ध गुन्हा दाखल करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.