ठाणे : ठाण्यातून एक मोठी बातमी समोर आलीय. किसन नगरमध्ये ठाकरे आणि शिंदे गट आमनेसामने आले. शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांकडून ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना प्रचंड मारहाण करण्यात आल्याचा आरोप करण्यात येतोय. संबंधित प्रकार कॅमेऱ्यातही कैद झालाय. विशेष म्हणजे या मारहाणीवेळी खासदार राजन विचारे हे देखील घटनास्थळी होते. किसन नगरमध्ये ठाकरे गटाकडून मेळावा घेण्यात येत होता. यावेळी शिंदे गटाचे कार्यकर्ते योगेश जानकर यांच्याकडून ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांवर मारहाण करण्यात आल्याचा आरोप करण्यात येतोय.
किसन नगर परिसर हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा गड मानला जातो. या नगरमध्ये ठाकरे गटाकडून कार्यकर्त्यांचा मेळावा आणि नव्या शाखेचं उद्घाटन करण्यात येत होतं. पण याचवेळी शिंदे आणि ठाकरे गट आमनेसामने आला.
ठाकरे गटाचे खासदार राजन विचारे शाखेच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला आले होते. त्यांच्यासोबत किसन नगरमधील ठाकरे गटाच्या इतर पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी देखील कार्यक्रमाला उपस्थिती लावली होती.
ठाकरे गटाचा कार्यक्रम सुरु असताना संबंधित परिसरात शिंदे गटाचे कार्यकर्ते आणि माजी नगरसेवक दाखल झाले. त्यांनी ठाकरे गटाच्या कार्यक्रमाला विरोध दर्शवला. या दरम्यान दोन्ही गटाचे कार्यकर्ते आमनेसामने आले. या कार्यकर्त्यांनी सुरुवातीला एकमेकांच्या विरोधात घोषणाबाजी केली. या घोषणाबाजीचं रुपांतर मारहाणीत झालं. शिंदे गटाकडून ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना मारहाण करण्यात आली.
दोन्ही गट आता ठाण्यातील श्रीनगर पोलीस ठाणे येथे दाखल झाले आहेत. त्यांनी एकमेकांवर तक्रार करण्याची प्रक्रिया सुरु केलीय. या प्रकरणी पोलीस नेमकी काय कारवाई करतात ते पाहणं महत्त्वाचं ठरेल.
शिंदे-ठाकरे गटाचा मारहाणीचा व्हिडीओ :
या घटनेनंतर ठाकरे गटाचे नेते खासदार राजन विचारे यांनी ‘टीव्ही 9 मराठी’ला प्रतिक्रिया दिली. “आम्ही उपजिल्हाप्रमुखांच्या कार्यालयात गेलो होतो. तिथून निघताना शंभर ते दीडशे लोकांनी हल्ला केला. त्यामुळे आम्ही पोलीस ठाण्यात आलोय. पण वीस-पंचवीस मिनिटे झाली तरी तक्रार दाखल केलेली नाही”, असं राजन विचारे यांनी सांगितलं.
“त्यांची मनमानी सुरुय. स्वत:च्या पदाचा गैरवापर सुरु आहे. त्यांची सत्ता असलेल्या ठिकाणी ते फिरु देण्यास मज्जाव करतात. अशी गुंडगिरी महाराष्ट्रात कधीच झाली नव्हती”, असा घणाघात राजन विचारे यांनी केला.