ठाणे: राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार आज होईल उद्या होईल सांगितलं जात आहे. मात्र, हा विस्तार काही होताना दिसत नाही. त्यामुळे अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. मंत्रिमंडळ विस्तार झाला आणि त्यात स्थान नाही मिळालं तर आमदार नाराज होतील म्हणून हा विस्तार केला जात नाही का? असं सांगितलं जात आहे. मात्र, हा दावा राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी फेटाळून लावला आहे. या चर्चेत काही तथ्य नाही, असं सांगतानाच राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार शंभर टक्के होणारच आहे, असं दीपक केसरकर यांनी स्पष्ट केलं आहे. ते मीडियाशी संवाद साधत होते.
पूर्वी सुद्धा अनेक वेळा असं घडलं. त्यांच्या काळात आमच्यापेक्षा जास्त काळ पहिला विस्तार झाला नव्हता. दुसरा विस्तार तर दोन दोन वर्षे झाला नव्हता. आम्हाला फक्त सहा महिने झालेत. आमचं पहिलं कर्तव्य लोकांना न्याय देणे हे आहे. त्यामुळे आमच्या सर्व आमदारांनी सांगितलं होतं की, फक्त आमचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असावे किंवा भाजपच्या लोकांनी सांगितले देवेंद्र फडणवीस असावेत.
आम्ही सगळे लोक मंत्री झाल्यासारखे आहोत, ही भावना घेऊन जे आमदार काम करतात त्यांची विनाकारण बदनामी करायची, त्यांच्याबद्दल वाईट बोलायचं हे खरोखर चुकीचं आहे, असं दीपक केसरकर म्हणाले. योग्य वेळेला या सगळ्या प्रश्नांची उत्तरे मी प्रवक्ता म्हणून निश्चितपणे देईल, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
शिवजयंती पूर्वी सरकारमध्ये उलथापालथ होणार असल्याचा दावा विरोधकांकडून केला जात आहे. त्यावरही केसरकर यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. ते दावे नेहमीच करतात. त्यांचे दावे नेहमी फोल ठरतात. स्वप्न बघण्यात काही चुकीचं नसतं. जे झोपतात ते स्वप्न बघतात. त्यामुळे त्यांनी स्वप्न बघत राहावे. आम्ही जागेपणी जनतेसाठी काम करत राहू, असा चिमटा त्यांनी काढला.
शिक्षक मतदार संघात कुणाला पाठिंबा देणार याबाबत मनसे आमदार राजू पाटील यांनी अद्याप आदेश नसल्याचे सांगितलं होतं. मात्र आज बाळासाहेबांचे शिवसेना व भाजप युतीचे उमेदवार ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्यासाठी झालेल्या सभेत मनसे आमदार राजू पाटील यांचा बॅनरवर फोटो लावण्यात आला होता.
त्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या होत्या. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. सगळ्यांच्या मनामध्ये आमचा उमेदवार आहे. त्यामुळे काही राजकीय अपरिहार्यता असते म्हणून त्यांनी असं म्हटलं असेल. त्याचा पाठिंबा सुद्धा आम्हाला असेल याची मला खात्री आहे, असंही ते म्हणाले.
धनुष्यबाण हे बाळासाहेबांचे आहे आणि त्यामुळे ते बाळासाहेबांच्या शिवसेनेलाच मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. तसेच त्यांनी भारत जोडे यात्रेत सहभागी झालेल्या संजय राऊत यांच्यावर नाव न घेता टीका केली. काश्मीरमध्ये जावून ज्यावेळी शिवसेना काँग्रेसचे स्वागत करते, तेव्हा बाळासाहेबांना काय वाटलं असेल? असा सवाल त्यांनी केला.