ठाणे : ठाण्यातून एक मोठी बातमी समोर आलीय. ‘हर हर महादेव’ चित्रपटावर माजी खासदार संभाजीराजे यांनी आक्षेप घेतल्यानंतर आता विविध संघटनांकडून या चित्रपटावर आक्षेप घेतला जातोय. विशेष म्हणजे ठाण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी विवियाना मॉलमध्ये चित्रपटगृहात घुसून प्रेक्षकांना बाहेर काढलं. यावेळी तेथील मॅनेजर आणि प्रेक्षकांमध्ये प्रंचड हाणामारी देखील झाली. जितेंद्र आव्हाड यांनी यावेळी मध्यस्थी केली. पण या मारहाणीत एका प्रेक्षकाचे कपडे फाडल्याचं कॅमेऱ्यात कैद झालंय.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांकडून प्रेक्षकांना चित्रपटगृहातून बाहेर काढल्यानंतर काही प्रेक्षकांकडून मॅनेजरकडे तिकीटाचे पैसे परत देण्याची मागणी करण्यात आली. यावेळी मॅनेजर आणि काही प्रेक्षकांमध्ये बाचाबाची झाली. यातून झालेल्या मारहाणीत एका प्रेक्षकाचे कपडे फाटल्याचं देखील बघायला मिळालं.
यावेळी जितेंद्र आव्हाड यांनी प्रतिक्रिया दिली. “चित्रपटात मावळे कसे दाखवले गेले आहेत? देयसौंदर्य हा चित्रपटातला अविभाज्य भाग आहे. त्यामुळे आपण संबंधित पात्र कुणाला देतोय याचं भान असलं पाहिजे. त्यातून पुढे मेसेज काय जाणार आहे याचा विचार केला पाहिजे”, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले.
जितेंद्र आव्हाड आणखी काय-काय म्हणाले?
तुम्ही जर मावळा लुळा-पांगळा, बारीक दाखवला तर तो मावळा म्हणताच येणार नाही. अभिनेता अक्षय कुमारला आमचा विरोध नाही. पण अक्षय कुमारचं जे आज वय आहे त्या वयात महाराजांचं निधन झालं होतं. महाराजांच्या लढाया या 16 ते 46 या वयादरम्यान झाल्या होत्या. त्यावयात अक्षय कुमार नाही बसू शकत.
चित्रपटाला हाईक द्यायचं तर अशी विकृती करुन हाईक नाही देता येणार. अफजल खानाला मांडीवर झोपवून शिवाजी महाराज कोथळा काढतात. कशाला मांडीवर दाखवता?
तीन मिनिटांचा खेळ होता. शिवाजी महाराज गडावर आले, अफजल थानने मिठी मारली. त्याने मागून पाठीत कट्ट्यार घालण्याचा प्रयत्न केला. महाराजांनी चिलखत घातलं होतं. महाराजांनी वाघनखं काढली आणि अफजल खानचा कोथळा काढला. हे सगळं स्पष्ट असताना तुम्ही विकृती का दाखवता?
शिवाजी महाराज आणि बाजी प्रभूंची लढाई झाली. आणि बाजी प्रभू मागणी करत होते की मला शिवाजींमा धडा शिकवायचा असं वाक्य तोंडून टाकायचं. शिवाजी महाराज आणि बाजी प्रभू यांचं नातं गेले 350 वर्षे महाराष्ट्राला माहिती आहे. बाजी प्रभू किती विनम्र माणूस होता. ते किती महाराजांचा आदर करायचे. असं विकृत का दाखवायचं?
आव्हाडांनी बंद पाडलेला शो मनसेने केला सुरु
दरम्यान, जितेंद्र आव्हाड यांनी बंद पाडलेला शो पुन्हा सुरु करा, अशी मागणी मनसे नेते अविनाश जाधव यांनी केली. त्यानंतर हा शो अविनाश जाधवांनी सुरु देखील केला.
“आव्हाडांनी बंद पाडलेला शो सुरु करा. जितेंद्र आव्हाड काही सेन्सॉर बोर्ड नाही. लोकांनी घाबरायची गरज नाही. मनसे तुमच्यासोबत आहे. संस्कृकतीची वार्ता करणाऱ्यांनी अशाप्रकारे येऊन प्रेक्षकांना मारणं ही कोणती संस्कृती आहे? हे आम्हाला पटवून सांगा”, असं अविनाश जाधव म्हणाले.
“मागच्यावेळी तुम्ही तुमच्या बंगल्यात घेऊन जाऊन एकाला मारलं होतं तेच आज इथे येऊन केलं. नक्की तुम्ही बदलत नाही आहात. तुम्ही लोकांना गृहीत धरत आहात. हा चित्रपट सुरु होऊन नऊ-दहा दिवस झाले. काहीतरी स्टंट मारु नका. महाराष्ट्राचे प्रेक्षक तुम्हाला माफ करणार नाही. राज ठाकरे प्रेक्षकांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे आहेत”, असंदेखील ते म्हणाले.