कल्याण | 19 मार्च 2024 : २०१९ मध्ये संपन्न झालेल्या निवडणूकीपेक्षा कल्याण लोकसभा क्षेत्रात ५३ हजार २८२ मतदारांची भर पडली असून या लोकसभेमध्ये २२ हजार १७९ युवा मतदारांना पहिल्यांदा मतदानाचा हक्क बजावण्याची संधी मिळणार आहे. १० लाख ८५ हजार ७१० पुरुष मतदार, ९ लाख ३२ हजार ५१० महिला, ७३८ इतर अशी मतदारांची विभागणी आहे. ५६५ सैनिक, १८ वर्षे पूर्ण केलेले २२ हजार १७९, २० ते २९ वयोगटातले ३ लाख ११ हजार ६९४, दिव्यांग १० हजार ८०२, पंच्याईंशी पेक्षा जास्त वय असलेले १८ हजार १७९ मतदारांचा त्यात समावेश असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी सुषमा सातपुते यांनी दिली.
कल्याण लोकसभा क्षेत्रात 1955 मतदान केंद्र आहेत. निवडणूक शांततेत पार पाडण्या बरोबरच मतदानाचे टक्केवारी वाढावी यासाठी नागरिकांनी मतदानासाठी यावे असे आवाहन सातपुते यांनी केले. मागील लोकसभा निवडणुकीत कल्याण लोकसभा मतदारसंघात 45 टक्के इतके कमी मतदान झाले होते. त्यामुळे 75 टक्के मतदान होणे आयोगाला अपेक्षित आहे. टक्केवारी वाढावी यासाठी जास्तीत जास्त मतदारांची नोंदणी करण्यात आली आहे.
सरकारी अधिकारी, कर्मचारी असे मिळून सुमारे १३ हजार कर्मचारी या लोकसभा क्षेत्रात निवडणूक विषयात कार्यरत असतील. चोवीस तास फ्लाईंग स्कॉड कार्यरत असणार आहे. १९५० या नंबरवर डायल करून मतदार आपले मतदार यादीतले नाव नक्की करू शकतात असेही सांगण्यात आले.