ठाणे : कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतील पलावा गृहसंकुलातील फ्लॅट धारकांना ६६ टक्के टॅक्समध्ये सवलत मिळावी. यासाठी मागील दोन वर्षापासून मनसे आमदार राजू पाटील हे केडीएमसीकडे पत्रव्यवहार आणि पाठपुरावा करत आहेत. परंतु त्यांना टॅक्समध्ये कोणतीही सवलत न देता उलट टॅक्स न भरल्याने त्यांना जप्तीच्या नोटीस पालिकेकडून पाठवण्यात आल्या आहेत. यामुळे गृहसंकुलातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या दिलेल्या नोटीस मागे घ्या. यावर पहिल्यांदा निर्णय घ्या, तर नागरिक टॅक्स भरतील. याचा फायदा गृह संकुलातील २५ हजार फ्लॅट धारकांना होईल. अशा सूचना राजू पाटील यांनी केडीएमसी आयुक्तांना केल्या.
तसेच यासंदर्भात निर्णय का थांबलाय माहीत नाही. याचे श्रेय कोणाला घ्यायचे असेल तर त्यांनी घ्यावे आणि काम पटकन करून टाकावे. परंतु लोकांना वेठीस धरू नये असे सांगत मनसे आमदार पाटील यांनी अप्रत्यक्षपणे सत्ताधाऱ्यांवर टीका केली आहे. गेल्या काही दिवसांपासून डोंबिवली परिसरात रेती माफिया मोठ्या प्रमाणात उत्खनन करत आहेत. याबाबत मनसे आमदार राजू पाटील हे आक्रमक झालेत. त्यातही मोठा गाव परिसरात रेल्वे ट्रॅकच्या बाजूला रेती उत्खनन होत आहे. कधीतरी एखादी कारवाई होते. बाज वगैरे पकडतात ती तोडतात. मात्र आता त्या ठिकाणची परिस्थिती भयानक झाली आहे.
रेल्वेच्या ट्रॅक खचू शकतो. माणकोली ब्रिज तयार होतो. तो परिसर सोडून रेती उपसा व्हायला पाहिजे. मात्र तसं काय होताना दिसत नाही. एखादी दुर्घटना घडल्यावरच आपण त्याच्या पाठी पळणार आहोत का किंवा ती गांभीर्याने घेणार आहोत का, असा सवाल राजू पाटील यांनी केला. सरकारने या रेती उपशासाठी नियोजन ठरवून निर्णय लवकर घ्यावा, असंही ते म्हणाले.
डोंबिवली स्टेशन परिसराला फेरीवाल्याने विळखा घातला. प्रवासी आणि नागरिकांना यांचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. तसेच रिक्षा या देखील नियोजन बद्ध उभ्या नसतात. यामुळे वाहतुकीला देखील अडथळा निर्माण होत असतो. याच संदर्भात राजू पाटील यांनी केडीएमसी आयुक्त भाऊसाहेब दांगडे यांची भेट घेतली. हा परिसर फेरीवाला मुक्त करावा अशी मागणी केली आहे. तसेच यावेळी कल्याण डोंबिवली महानगर पालिकेला १५ दिवसाची मुदत मनसेकडून कडून देण्यात आली आहे. अन्यथा आंदोलन करू असा इशारा राजू पाटील यांनी दिला आहे.
तसेच हा परिसर फेरीवाला मुक्त झाल्यास त्याठिकाणी तीन ते चार रिक्षा स्टँड होऊ शकतात. तसेच २० अबोली रिक्षा चालतात. त्यासाठी रिक्षा स्टँड करून दिलं तर योग्य होईल. अशा सूचना मनसे आमदार राजू पाटील यांनी केडीएमसी आयुक्त भाऊसाहेब दांगडे यांना केल्या. तसेच स्टेशन परिसर फेरीवाला मुक्त झाला नाहीतर आंदोलन करू असे असा इशारा देखील त्यांनी यावेळी दिला.