डोंबिवली : चाकूचा धाक दाखवित पाच जणांनी एका बँक कर्मचाऱ्याला लुटण्याची धक्कादायक घटना डोंबिवलीतील ठाकूर्ली परिसरात 25 डिसेंबर रोजी रात्रीच्या सुमारास घडली होती. आरोपी सीसीटीव्हीत कैद झाले होते. या प्रकरणी डोंबिवली रामनगर पोलिसांनी गुन्हा दाखल करीत आरोपींचा शोध सुरु केला. सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी पाच जणांना सापळा रचत अटक केली आहे. आशु दुमडा, कुणाल बोध, विशाल जेठा, सलमान पुहाल, गणेश लोट अशी या आरोपींची नावे आहेत.
मुंबईतील एका खाजगी बँकेत कामाला असलेले संतोषकुमार शर्मा हे डोंबिवली पूर्व भागातील ठाकुर्ली परिसरातील चामुंडा गार्डनमध्ये राहतात. 25 डिसेंबरच्या मध्य रात्री 1 वाजून 40 मिनिटांच्या दरम्यान संतोष कुमार रस्त्याने घरी जात असताना मास्क परिधान केलेल्या पाच तरुणांनी त्यांचा पाठलाग केला. या चोरट्यांनी संतोष कुमारला घेरले. त्याच्या गळ्यावर चाकू लावून त्यांच्याकडील दोन लॅपटॉप, महागडा मोबाईल एटीएम आदी सर्व घेऊन पसार झाले.
या याप्रकरणी डोंबिवली रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. रामनगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन सांडभोर पोलीस निरीक्षक समशेर तडवी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकारी संदीप शिंगटे यांच्या पथकाने तपास सुरू केला. घटनेनंतर आरोपी पळून जाताना सीसीटीव्ही पोलिसांच्या हाती लागले. हे सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक तपासाच्या आधारे रामनगर पोलिसांनी त्रिमुर्तीनगर वसाहतीमधील वाल्मिक वस्तीमधील मंदिराचे पाठिमागील तबेल्याजवळ सापळा रचत या पाचही आरोपींना अटक केली आहे. त्यांच्याकडून चोरीस गेलेला मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे.
या पाचही आरोपींना कल्याण न्यायालयात हजर केले असता 30 तारखेपर्यंत न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान डोंबिवली ठाकुर्लीला जोडणाऱ्या 90 फिट रोड परिसरात या आधी देखील अशा घटना घडल्या असून याठिकाणी पोलीस चौकीची मागणी केली जात आहे. याबाबत या ठिकाणी पोलीस चौकीची प्रक्रिया सुरू असल्याचं एसीपीचे डी मोरे यांनी सांगितलं. (Five arrested for stabbing bank employee in dombivali)
इतर बातम्या
VIDEO | कॉफी शॉपमध्ये गुप्त जागा, अश्लील चाळे करताना प्रेमी युगुलं रंगेहाथ