Thane Child Death : चॉकलेट घेऊन टेरेसवर गेला अन् परतलाच नाही, ठाण्यात चार वर्षाच्या चिमुरड्याचा टेरेसवरुन पडून मृत्यू

| Updated on: Jun 15, 2022 | 6:24 PM

घटनेपूर्वी मुलगा दुकानातच होता. तिथे त्याला एका नातेवाईकाने चॉकलेट देऊन शाळेच्या पहिल्या दिवसासाठी शुभेच्छा दिल्या. चॉकलेट घेऊन श्लोकला वरच्या मजल्यावर टेरेसकडे जाताना कुटुंबीयांनी शेवटचे पाहिले होते. घरचे जेव्हा मुलाला पहायला टेरेसवर गेले तेव्हा तो तिथे नव्हता.

Thane Child Death : चॉकलेट घेऊन टेरेसवर गेला अन् परतलाच नाही, ठाण्यात चार वर्षाच्या चिमुरड्याचा टेरेसवरुन पडून मृत्यू
उदयपूर हत्याकांडानंतर प्रशासन सतर्क
Follow us on

ठाणे : शाळेचा पहिलाच दिवस, चिमुरड्याचाही उत्साह शिगेला, घरचे शाळेच्या तयारीत मग्न. नातेवाईकाने शाळेच्या पहिल्या दिवसासाठी चॉकलेट देऊन शुभेच्छा दिल्या. चॉकलेट घेऊन चिमुरडा टेरेस (Terrace)वर गेला. मात्र पुन्हा खाली आलाच नाही म्हणून घरच्यांनी शोधाशोध केली तर गंभीर जखमी अवस्थेत आढळला. ठाणे पश्चिमेकडील पाचपाखाडी भागातील गीता अपार्टमेंटमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. पाचव्या मजल्यावरील टेरेसवरून पडून मंगळवारी एका 4 वर्षाच्या मुलाचा मृत्यू (Death) झाल्याची हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे. श्लोक म्हात्रे असे या चिमुरड्याचे नाव आहे. श्लोकच्या अचानक जाण्याने म्हात्रे कुटुंबावर शोककळा पसरली आहे. याप्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात अपघाती मृत्यू (Accidental Death)ची नोंद करण्यात आली असून पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

टेरेसवरुन वाकून पाहताना तोल जाऊन पडल्याचा अंदाज

टेरेस हे मुलाचे घरातील आवडते ठिकाण होते. तो नेहमी तेथे खेळायचा. मंगळावारीही तो नेहमीसारखा टेरेसवर खेळायला गेला होता. खेळता खेळता टेरेसवरुन खाली वाकून पाहताना त्याचा तोल जाऊन तो पडला असावा, असा अंदाज कुटुंबीयांनी व्यक्त केला आहे. म्हात्रे कुटुंबाचे राहत्या इमारतीतच दुकान आहे. घटनेपूर्वी मुलगा दुकानातच होता. तिथे त्याला एका नातेवाईकाने चॉकलेट देऊन शाळेच्या पहिल्या दिवसासाठी शुभेच्छा दिल्या. चॉकलेट घेऊन श्लोकला वरच्या मजल्यावर टेरेसकडे जाताना कुटुंबीयांनी शेवटचे पाहिले होते. घरचे जेव्हा मुलाला पहायला टेरेसवर गेले तेव्हा तो तिथे नव्हता. टेरेसवरुन मुलगा कधी खाली पडला हे कुणालाच कळले नाही. तो नेहमी ज्या जागेवर खेळायचा तिथे पाहिले मात्र तो सापडलाच नाही.

गेल्या आठवड्यातही मुलगा एकटाच टेरेसवर गेला होता. मात्र शेजाऱ्यांनी पाहिले आणि अडवले, असे शेजारच्या महिलेने सांगितले. मुलाला गंभीर जखमी अवस्थेत रुग्णालयात नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. याप्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली असून शवविच्छेदन अहवालानंतरच सर्व स्पष्ट होईल असे पोलिसांनी सांगितले. (Four year old child dies after falling from fifth floor terrace in Thane)

हे सुद्धा वाचा