दिवा | 17 सप्टेंबर 2023 : गणपती उत्सव अवघ्या दोन दिवसावर येऊन ठेपला आहे. त्यामुळे चाकरमान्यांनी कोकणाची वाट धरली आहे. दिवा स्थानक, लोकमान्य टिळक टर्मिनसवर गावाला जाण्यासाठी चाकरमान्यांची प्रचंड गर्दी झाली आहे. गणेशोत्सवासाठी स्पेशल ट्रेन सोडण्यात आल्या आहेत. मात्र, या ट्रेनचं वेळापत्रक कोलमडल्याने गाड्या उशिराने धावत आहेत. त्यामुळे चाकरमान्यांचा चांगलाच खोळंबा झाला आहे. तर दुसरीकडे एसटी आणि खासगी बसेसनाही प्रचंड गर्दी झाल्याने चाकरमान्यांचा चांगलाच खोळंबा झाला आहे. कुटुंबकबिल्यासह गावाकडे जायला निघालेल्या चाकरमान्यांची ऐनवेळी चांगलीच तारांबळ उडाली आहे.
गणपती स्पेशल ट्रेनमुळे कोकण रेल्वेचं वेळापत्रक दुसऱ्या दिवशी कोलमडलं आहे. अनेक गाड्या अर्धा ते 4 तासांपर्यंत उशिराने धावत आहेत. कोकणकन्या, तुतारी, मेंगलोर एक्सप्रेस, कुडाळ गणपती स्पेशल, दिवा – रत्नागिरी या गाड्या विलंबानं धावत आहेत. मुंबईकडून तळकोकणात येणाऱ्या मार्गावर अनेक गाड्या खोळंबल्या आहेत. वीरपासून तळकोकणापर्यंत कोकण रेल्वेचा सिंगल ट्रॅक आहे. मुंबईहून तळ कोकणात जाण्यासाठी रेल्वेने 12 तास लागत आहे. चार तास गाड्या उशिराने धावत असल्याने प्रवाशांना रेल्वे स्थानकावरच चार तास खोळंबून राहावं लागत आहे.
दरम्यान, दिवा रेल्वे स्टेशनवर प्रवाशांची गर्दी झाली आहे. कोकणात जाण्यासाठी दिवा रेल्वे स्थानकात प्रवाशांची गर्दी झाली आहे. दिवा-रत्नागिरी पॅसेंजरला प्रचंड गर्दी झाली आहे. सर्वचजण कुटुंबकबिल्यासह स्टेशनवर आले आहेत. पण गाड्यांना प्रचंड गर्दी झाल्याने गाडीत चढणंही या प्रवाशांसाठी जिकरीचं झालं आहे.
राज्यभर गणेशोत्सवासाठी लगबग सुरू आहे. पुण्यातून कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांनी बसस्थानकांवर प्रचंड गर्दी केली आहे. स्वारगेट बस स्थानकावरुन गणेशोत्सवासाठी गावी जाणाऱ्यांची मोठी गर्दी झाली आहे. पुण्याहून कोकण आणि मराठवाड्यात जाण्यासाठी नागरिकांची बस स्थानकांवर गर्दी झाली आहे. गणेशोत्सवासाठी एसटी महामंडळ देखील सज्ज झाले आहे. एसटी महामंडळाकडून आज आणि उद्या 190 जादा बसेस सोडण्यात येणार आहे. पुण्यातील स्वारगेट, वाकडेवाडी बस स्थानकांत प्रवाशांनी तुफान गर्दी केली आहे.
वसई, विरार, नालासोपाऱ्यातून 350च्यावर एसटी महामंडळाच्या बस काल रात्री कोकणात रवाना झाल्या आहे. या रवाना झालेल्या बसमधून कोकणवासीयांचे स्वागत करण्यासाठी आणि या जाणाऱ्या बसची आम्हीच सुविधा केली आहे हे दाखविण्यासाठी शिवसेना शिंदे आणि ठाकरे गटाची मात्र श्रेयवादाची लढाई पाहायला मिळाली आहे. विरार पूर्व मनवेलपाडा तलाव परिसरात आज सकाळ पासूनच कोकणात जाण्यासाठी जळगाव, औरंगाबाद, अर्नाळा, वसई, विरार, नालासोपारा बस आगारातील अडीचशेच्या वर बस दाखल झाल्या होत्या.
गणेशोत्सवासाठी कोकणात जाण्यासाठी विशेष बसेस उपलब्ध करून मुरजी पटेल यांनी 51 बसेसला काल अंधेरी पूर्वमधील शेर ए पंजाब येथील बृहन्मुंबई महानगरपालिका मैदान येथून हिरवा झेंडा दाखवला. तसेच प्रवाशांना प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या. या सेवेचा उद्घाटन सोहळा भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांच्या शुभहस्ते संपन्न झाला. या बसेसच्या माध्यमातून भाविक अंधेरी ते कोकण दरम्यान प्रवास करतील.
गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्या भाविकांची गर्दी अफाट असते. बसेसची आसन संख्या पूर्ण होऊन बस उपलब्ध नसतात. भाविकांना रिझर्वेशन मिळत नाही. ट्रॅव्हलसाठी दाणादाण उडते. या अनुषंगाने अंधेरी पूर्वमधील भाविकांसाठी सालाबादप्रमाणे यंदाही बसेस उपलब्ध करून दिल्या आहेत. या पुढाकारामुळे साधारणतः 2550 भाविक कोकणात प्रवास करू शकणार आहेत, असं मुरजी पटेल म्हणाले.