बदलापुरात मन हेलावणारी घटना घडली आहे. अवघ्या साडेतीन वर्षांच्या दोन चिमुरडींवर शाळेत लैंगिक अत्याचाराची घटना घडली आहे. या घटनेमुळे बदलापूरच्या नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. या घटनेच्या विरोधात बदलापूरकरांनी संपूर्ण रेल्वे स्थानक जाम केलं आहे. बदलापूरच्या नागरिकांनी गेल्या आठ तासांपासून रेल्वे सेवा ठप्प केली आहे. पोलिसांनी आंदोलकांना समजवण्याचा प्रचंड प्रयत्न केला. पण आंदोलक ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नाहीत. अखेर आंदोलकांचा आक्रोश पाहता भाजपचे संकटमोचक नेते अशी ख्याती असलेले ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन बदलापूर रेल्वे स्थानकावर दाखल झाले आहेत. गिरीश महाजन यांच्याकडून नागरिकांच्या मनधरणीचे सर्वोतोपरी प्रयत्न केले जात आहेत.
गिरीश महाजन आंदोलकांशी बोलू लागले यावेळी आंदोलकांनी ‘फाशी…फाशी…’ अशा घोषणाबाजी सुरु केली. यावेळी गिरीश महाजन यांनी नागरिकांना असा प्रश्न सुटणार आहे का? असा प्रश्न केला. आपलं म्हणणं अतिशय योग्य आहे. आरोपीवर कायदेशीर मार्गाने कारवाई होईल, असं आश्वासन गिरीश महाजन यांनी आंदोलकांना दिलं.
“घटना 13 तारखेला झाली आहे. 13 तारखेपासून पोलिसांनी काय केलं?”, असा सवाल आंदोलकांनी गिरीश महाजन यांना केला. यावेळी गिरीश महाजन यांनी या प्रकरणी एसआयटी स्थापन झाली आहे. आरोपीवर कठोर कारवाई केली जाईल, असं आश्वासन गिरीश महाजन यांनी दिलं.
“ज्या पोलिसांनी दिरंगाई केली आहे, ज्यांनी वेळकाढूपणा केला आहे. त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे. पोलिसांना सोडलं जाणार नाही. पोलिसांना सस्पेंड करता येईल. तात्काळ आरोपीला फाशी देता येत नाही. असा कायदा नाही. तुमचा राग मान्य आहे. तुमचा संताप मान्य आहे. योग्य आहे. पण आरोपीला थेट फाशी देता येत नाही. दोषी पोलिसांना आजच्या आज सस्पेंड केलं जाईल. आताच्या आता कारवाई करू. ज्यांनी केस घ्यायला उशीर केला, त्यांना सस्पेंड करू”, असं गिरीश महाजन यांनी आंदोलकांना वचन दिलं.
“तुमच्या मनात जेवढा राग आहे. तेवढा आमच्या मनातही आहे. गृहमंत्र्यांनी या प्रकरणाच्या एसआयटी चौकशीचे आदेश दिले आहेत. ही लाईफ लाईन आहे. अनेक डॉक्टर, पेशंट आणि विद्यार्थी ये जा करत असतात. एवढावेळ ट्रेन थांबवता येणार नाही. त्यामुळे लोकल सुरू करा”, असं आवाहन गिरीश महाजन यांनी केलं.