कल्याण डोंबिवलीत मुसळधार पाऊस सुरु आहे. सकाळपासूनच सतत धार सुरु असल्याने अनेक सखल भागात पाणी साचले आहे. हवामान खात्याने मुंबई, ठाणे, पालघर जिल्ह्यात आज मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. त्यामुळेच कल्याणच्या छत्रपती शिवाजी चौकात गुडघ्याभर पाणी साचले आहे. पावसामुळे कल्याण डोंबिवलीतील अनेक परिसरात वाहतूक कोंडी झाली असून पाण्यातून मार्ग काढत वाहन चालकाला प्रवास करावा लागत आहे. अधून मधून पावसाचा जोर कमी जास्त होत असल्याने पाण्याचा निचरा होताना दिसत आहे. मात्र पाण्याचा जोर कायम राहिला तर अनेक सकल भागत मोठ्या प्रमाणात पाणी शासनाची शक्यता आहे.
पावसामुळे डोंबिवलीतील ह प्रभाग क्षेत्र ऑफिस जवळील मुख्य रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. पालिका अधिकारी यांचे दुर्लक्ष, नाले सफाई न झाल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. कल्याण स्टेशन परिसरात रस्त्यावर गुडघ्याभर पाणी साचले आहे. पाण्यातून मार्ग काढत वाहन चालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. कल्याण कोर्ट स्पेशल रोडवर पाणीच पाणी आहे.
कल्याण दुर्गाडी किल्ल्या जवळील दुर्गा माता चौकात पाणी साचले आहे. रहदारीचा रस्ता असल्याने मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे. उल्हासनगरच्या मद्रासीपाडा परिसरात नागरिकांच्या घरांमध्ये पाणी शिरलं आहे. गेल्या २ तासांपासून उल्हासनगर शहरात मुसळधार पाऊस सुरु आहे. घरात पाणी आल्यानं नागरिकांची तारांबळ उडाली आहे.
कल्याण डोंबिवली परिसरात चार तासांपासून पावसाची संततधार सुरु आहे. डोंबिवली पूर्वेकडील एम आय डी सी परिसरातील पोस्ट ऑफीसच्या आवारात गुडघाभर पाणी साचलं आहे.
गुहागरमध्ये मुसळधार पावसाचा तालुक्यातील शृंगारतळी बाजारपेठेला तडाखा बसला आहे. बाजारपेठेत सर्वत्र पाणीच पाणी झाल्याने व्यापारी हैराण झाले आहेत. गुहागर चिपळूण महामार्गाला नदीचे स्वरूप आल्याने वाहन चालकांची तारांबळ उडाली आहे. पुढील दोन दिवस जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट असल्याने प्रशासनाकडून नागरिकांना खबरदारीच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
मुंबईतही मुसळधार पावसाचा इशारा
मुंबईकरांसाठी पुढचे 36 तास महत्वाचे आहेत. कारण मुंबईत 200 मिमी पाऊस पडणार असल्याचा हवामान विभागानं इशारा दिला आहे.
हवामान विभागानं (IMD) दिलेल्या माहितीनुसार, मुंबईत मुसळधार पाऊस (Mumbai Heavy Rain) पडण्याची शक्यता आहे.