अंबरनाथ (ठाणे) : आपला देश हा विविधतेने नटलेला आहे. इथे सर्व धर्माची नागरीक गुण्यागोविंदाने राहतात. पण काही समाजकंटक धर्माच्या नावाने माथी भडकवतात आणि हिंसाचार घडवून आणतात. असे प्रकार सातत्याने समोर येताना दिसतात. देशात आज विविध ठिकाणी असा प्रकार बघायला मिळाला. देशभरात आज रामनवमीचा उत्साह होता. पण या उत्साहा दरम्यान काही ठिकाणी आनंदाला गालबोट लावण्याचा प्रयत्न करण्यात आला. पण अंबरानाथमधील वांगणी गाव याला अपवाद ठरलं. वांगणी गावात अतिशय उत्साहाच्या वातावरणात रामनवमी सण साजरा करण्यात आला.
विशेष म्हणजे अंबरनाथ तालुक्यातील वांगणीत रामनवमी निमित्त निगगळक्या पालखीत हिंदू मुस्लिम ऐक्याचं दर्शन झालं. पवित्र रमजान महिन्यात आलेली रामनवमी हा दुग्धशर्करा योग्य असल्याचं सांगत मुस्लिम धर्मियांनीही भक्तिभावाने रामनवमीच्या पालखी सोहळ्यात सहभाग घेतला.
वांगणी गावात 1826 सालापासून रामनवमी उत्सव साजरा होतोय. या उत्सवाचं यंदा तब्बल 197 वावं वर्ष आहे. वांगणी गावात हिंदू आणि मुस्लिम धर्मीय अनेक वर्षांपासून एकोप्याने राहतायत. रामनवमीच्या पालखी सोहळ्यातही मुस्लिम धर्मीय उत्साहाने सहभागी होतात. आजही वांगणी गावातील विठ्ठल रुक्मिणी मंदिरापासून पालखी सोहळ्याला सुरुवात झाली.
यानंतर मुस्लिम मोहल्ल्यासह संपूर्ण गावात ही पालखी फिरली. या पालखीत घोडे, रथ यासह वारकरी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. वांगणी गावातील ही पालखी हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतिक असल्याचं यावेळी गावातील हिंदू आणि मुस्लिम धर्मियांनी सांगितलं.
दरम्यान, देशात काही ठिकाणी रामनवमीच्या सणाला गालबोट लागल्याचं बघायला मिळालं. कोलकाताच्या हावडामध्ये रामनवमीच्या यात्रेदरम्यान दगडफेक झाल्याची माहिती समोर आली आहे. हावडामध्ये गाड्यांची तोडफोड करण्यात आली आहे. हावडामधील शिवपुरी भागात ही तोडफोड करण्यात आली आहे. या घटनेमुळे परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे. सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर परिसरात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त करण्यात आला आहे. सध्या तरी परिसरात तणावपूर्ण शांतता दिसत आहे.
रामनवमीच्या निमित्ताने हावडामध्ये मिरवणूक काढण्यात आली होती. या मिरवणुकीत घोषणाबाजी करण्यावरुन वाद निर्माण झाल्याची माहिती मिळत आहे. या वादातून परिसरातील जाळपोळ करण्यात आली. अनेक गाड्या जाळण्यात आल्या. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांकडून गाड्यांना लागलेली आग विझवण्याचे प्रयत्न करण्यात आले. पोलिसांनी वादावर आता नियंत्रण मिळवल्याची देखील माहिती समोर आली आहे.