ठाणे : कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात एकाच रात्रीत तब्बल 17 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यामध्ये हे हॉस्पिटल आहे. या दुर्देवी घटनेनंतर कळव्याच्या या हॉस्पिटलमध्ये राजकीय पक्षाच्या नेत्यांची रांग लागली आहे. ते रुग्णालय प्रशासनाला जाब विचारतायत. दिवंगत शिवसेना नेते आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे हे सुद्धा या हॉस्पिटलमध्ये आले. त्यांनी रुग्णालयाच्या कारभारावर सडकून टिका केली.
“दोन दिवसआधी पाच जणांचा मृत्यू झाला. आज 18 जण गेलेत, त्यात 13 जण ICU मध्ये होते. जो रुग्ण हॉस्पिटलवर विश्वास ठेवून येतो, त्या रुग्णाचे आणि त्याच्या नातेवाईकाच्या जीवचे काय हाल होत असतील? ठेकेदाराच इथल्या स्वच्छतेकडे लक्ष नाही” असा आरोप केदार दिघे यांनी केला.
‘मुख्यमंत्र्यांना, आयुक्तांना आधी सांगायच’
“दुसरी गोष्ट सिव्हिल हॉस्पिटल बंद झालं, म्हणून आमच्यावर ओव्हर लोड आलाय, असं रुग्णालयाकडून सांगितलं जातय. जिल्ह्यातून लोक इथे उपचारासाठी येतात, प्रशानसाच हे म्हणणं किती दुर्देवी आहे. क्षमता नव्हती मग, मुख्यमंत्र्यांना, आयुक्तांना आधी सांगायच, आमची क्षमता नाही, तुम्ही दुसरी व्यवस्था करा” असं केदार दिघे म्हणाले.
‘कमिशन कोणाच्या खिशात जातं?’
“आज 18 मृत्यू झाल्यावर हे प्लानिग करता, भ्रष्टाचारात सगळं गेलं आहे. पेशंटना पॅथोलॉजी टेस्ट, स्कॅनसाठी बाहेर पाठवलं जातं. त्याचं कमिशन कोणाच्या खिशात जातं?” असा सवाल केदार दिघे यांनी केला.
केदार दिघे यांची मागणी काय?
“सर्वप्रथम डीनला निलंबित करा. गोडबोलून लोकांचे मृत्यू थांबवता येणार नाही. संकटावर मात कशी करणार? लोकांचे जीव कसे वाचवणार? याच उत्तर नाही. थातूर-मातूर उत्तर देऊन काहीतरी करतोय, हे दाखवण्याचा प्रयत्न आहे. हे दुर्देवी आहे” असं केदार दिघे म्हणाले.