ठाण्यातलं राजकारण तापलं असताना मोठ्या घडामोडींची चाहूल, आव्हाड-शिंदे-फडणवीस एकाच मंचावर येणार?

| Updated on: Nov 12, 2022 | 8:38 PM

ठाण्यात उद्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकाच मंचावर एकत्र दिसण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे विविध चर्चांना उधाण आलंय.

ठाण्यातलं राजकारण तापलं असताना मोठ्या घडामोडींची चाहूल, आव्हाड-शिंदे-फडणवीस एकाच मंचावर येणार?
Follow us on

ठाणे : महाराष्ट्राच्या राजकारणात कधी काय होईल? याचा काही भरोसा नाही. गेल्या तीन महिन्यांपूर्वी राज्यात घडलेल्या राजकीय घडामोडी या त्याबाबतचं चांगलंच उदाहरण आहेत. त्याआधी अडीच वर्षांपूर्वी विधानसभेच्या निवडणुकीनंतर भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं आलेलं 72 तासांचं सरकार हे देखील त्याचं उत्तम उदाहरण म्हणता येईल. ही उदाहरणं देण्यामागची कारणं म्हणजे ठाणे शहरात उद्या आयोजित करण्यात आलेला कार्यक्रम. या कार्यक्रमात सत्ताधारी आणि विरोधक दोन्ही बाजूचे दिग्गज नेते एकाच मंचावर एकत्र दिसण्याची दाट शक्यता आहे.

विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांची आज नुकतीच जामिनावर सुटका झालीय. पण ठाण्यातील उद्याच्या कार्यक्रमात ते कदाचित उपस्थित राहण्याची शक्यता आहे. हा कार्यक्रम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शुभहस्ते पार पडणार आहे. तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे असणार आहेत. या कार्यक्रमाचे अध्यक्ष ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री, शिंदे गटाचे नेते शंभूराज देसाई हे असतील. तर भाजप नेते आणि केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील यांचीदेखील या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थित असणार आहे.

दुसरीकडे या कार्यक्रमात ठाण्याचे स्थानिक खासदार आणि ठाण्यातील शिवसेनेच्या ठाकरे गटाचा खमका आवाज म्हणून ओळखीचे असलेले राजन विचारे हे देखील उपस्थित असणार आहेत. शिंदे-फडणवीस उपस्थित असताना ठाकरे गटाचे राजन विचारे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे जितेंद्र आव्हाड या कार्यक्रमात उपस्थित राहणार असल्याने या कार्यक्रमाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष असणार आहे.

हे सुद्धा वाचा

ठाण्यात नेमका कार्यक्रम आहे तरी कसला?

ठाणे महापालिकेने कळवा खाडीवर नव्याने पूल उभारलाय. हा नवा पूल पोलीस आयुक्त कार्यालय ते कळवा चौक असा आहे. या रस्त्याला बेलापूर रोड असंही संबोधलं जातंय. ठाणे महापालिकेकडून याच पुलाचा उद्या लोकार्पण सोहळा आयोजित करण्यात आलाय. या कार्यक्रमात सर्वपक्षीय दिग्गज नेते सहभागी होणार आहेत. त्यामुळे या कार्यक्रमाकडे ठाणेकरांसह अनेक राजकीय विश्लेषक आणि पत्रकारांचं लक्ष लागलं आहे.

कार्यक्रमाला इतकं महत्त्व प्राप्त होण्यामागील कारण काय?

या कार्यक्रमाला जास्त महत्त्व प्राप्त होण्यामागील कारण म्हणजे ठाण्यातील सध्याच्या राजकीय घडामोडी. जितेंद्र आव्हाड यांनी चार दिवसांपूर्वी ठाण्याच्या विवियाना मॉलच्या चित्रपटगृहात शिरुन ‘हर हर महादेव’ चित्रपटाचा शो बंद पाडला होता. या कार्यक्रमात एका प्रेक्षकाला त्याचे कपडे फाटेपर्यंत मारहाण झाल्याचं कॅमेऱ्यात कैद झालं होतं. पण आपल्या कार्यकर्त्यांनी ही मारहाण केली नाही, अशी भूमिका आव्हाडांनी मांडली होती. पण हेच मारहाणीचं प्रकरण जितेंद्र आव्हाडांना भोवलं.

जितेंद्र आव्हाड यांना ठाणे पोलिसांनी शुक्रवारी आधी दुपारी नोटीस पाठवली. ही नोटीस चौकशीसाठी पाठवण्यात आली होती. पण पोलीस ठाण्यात गेल्यावर त्यांना अटक करण्यात आली. त्यांच्या अटकेनंतर ठाण्यातील वातावरण चांगलंच तापलं. शेकडो कार्यकर्ते ठाण्याच्या वर्तक नगर पोलीस ठाण्याबाहेर दाखल झाले आणि त्यांनी ठिय्या आंदोलन केलं.

यावेळी राज्य सरकारविरोधात प्रचंड रोष व्यक्त करण्यात आला. जितेंद्र आव्हाडांना अटकेनंतर लगेच कोर्टात हजर केलं जाईल आणि जामीन मंजूर केला जाईल,अशी शक्यता वर्तवली जात होती. पण उशिर झाल्याने कोर्टाच्या कामकाजाची वेळ संपली. त्यामुळे जितेंद्र आव्हाडांना कालची रात्र पोलीस ठाण्यातच काढावी लागली.

जितेंद्र आव्हाडांना आज ठाणे सत्र न्यायालयात पोलिसांनी हजर केलं. यावेळी दोन्ही बाजूचा युक्तीवाद ऐकून घेतल्यानंतर कोर्टाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यानंतर आव्हाडांच्या वकिलांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. मुंबई उच्च न्यायालयात आव्हाडांच्या वकिलांनी जोरदार युक्तीवाद केल्यानंतर त्यांना 15 हजारांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर झाला.

जितेंद्र आव्हाडांना जामीन मंजूर झाल्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी राज्य सरकारवर गंभीर आरोप केले. आपल्याला घाईगडबडीत अटक करण्यात आली. आपण काहीही करु शकतो, हे दाखवण्यासाठी अटक केली, असा आरोप आव्हाडांनी राज्य सरकारवर केला. यावेळी त्यांनी पोलिसांवर आपण नाराज नसल्याचं स्पष्ट केलं. पोलिसांवर आपल्या अटकेसाठी दबाव होता, असं आव्हाडांनी स्पष्ट केलं. त्यांच्या या स्पष्टीकरणानंतर लगेच दोन तासांनी डीसीपी विनयकुमार राठोड यांच्या बदलीची बातमी समोर आली.

जितेंद्र आव्हाड कार्यक्रमात सहभागी होणार

जितेंद्र आव्हाडांना या कार्यक्रमाबद्दल प्रश्न विचारला असता आपल्याला संबंधित कार्यक्रमाची निमंत्रण पत्रिका मिळाली नसल्याचं त्यांनी सांगितलं. संबंधित कार्यक्रमाची पत्रिका मिळाली तर मी कार्यक्रमात जाईन. कारण माझ्या मतदारसंघाचा कार्यक्रम आहे. ते माझ्या मतदारसंघात पाहुणे म्हणून येणार आहेत, अशी भूमिका जितेंद्र आव्हाडांनी मांडली.

दुसरीकडे राजन विचारे यांना याबाबत प्रश्न विचारला असता त्यांनी आपल्या कार्यक्रमाचं निमंत्रण आलं नाही. कार्यक्रम पत्रिका अद्याप मिळाली नसल्याची प्रतिक्रिया दिली.

सत्ताधारी-विरोधक कार्यक्रमात उपस्थित राहीले तर?

ठाण्यातील उद्याच्या कार्यक्रमात सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील दिग्गज नेते उपस्थित राहीले तर विकास कामांवरुन श्रेयवाद होतो का? ते पाहणं देखील महत्त्वाचं ठरेल. विशेष म्हणजे ठाण्यातील सध्याचं राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. अशा परिस्थितीत या कार्यक्रमात सर्वपक्षीय नेते एकाच मंचावर उपस्थित राहणार असल्याने हा कार्यक्रम महत्त्वाचा मानला जातोय.