निखिल चव्हाण, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, ठाणे: राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांचा एक भावनिक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये आव्हाड यांच्या एका हातात कुराण आहे तर दुसऱ्या हातात भगवद्गीता दिसत आहे. आव्हाड यांच्यावर एका महिलेने आरोप केल्यानंतर हा व्हिडीओ बनवला गेला आहे. तो सध्या व्हायरल होत असून या व्हिडीओची राजकीय वर्तुळात प्रचंड चर्चा रंगली आहे. या व्हिडीओतून जितेंद्र आव्हाड आपलं म्हणणं मांडताना दिसत आहेत. तसेच आपल्याविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्याचा डाव आखला जात असल्याचा दावाही त्यांनी केला आहे.
जे मी केलं नाही त्याची शिक्षा मी का भोगू? असा सवाल जितेंद्र आव्हाड यांनी या व्हिडीओतून विचारला आहे. ज्या महिलेने माझ्याविरुद्ध 354 गुन्हा नोंद केला ती महिला मुंब्रात येऊन नेत्यांना मंत्र्यांना भेटते. तसेच मंत्रालयात देखील त्यांना भेटायला जाते. 354 सारखा गुन्हा हा माझ्या मनाला लागलेला आहे. माझ्यावर 304 गुन्हा दाखल केला असता तरी चाललं असतं, असं जितेंद्र आव्हाड हातात कुराण आणि भगवद्गीता घेऊन बोलताना दिसत आहेत.
ज्या महिलेच्या विरोधात गंभीर गुन्हा नोंद झाला आहे, त्या महिलेला पोलीस रक्षण देत आहेत. माझ्याविरुद्ध बलात्काराचा गुन्हा नोंद करण्याची तयारी सुरू झाली आहे. जी गोष्ट मी केलीच नाही येत त्या गोष्टीसाठी मी कधीच गुन्हेगार बनणार नाही. जर कायद्याने हेच होणार असेल तर मी देखील कायदा हातात झाला तयार आहे, असा इशाराच आव्हाड यांनी दिला आहे.
मी आजपर्यंत हे मनातून निघालं नाही. माझ्या मनातून कधी निघणारही नाही. माझ्या मृत्यूसोबतच माझ्या मनातून ते जाईल. या लढाईत मला कुणाची साथ नकोय. मला देवाने एकट्याने लढायचं बळ दिलं आहे. मी माझी लढाई एकट्यानेच लढणार आहे. मी एवढा दुबळा नाहीये. मी जेवढ्या लढाया लढलो त्यावेळी माझ्यामागे कोण आहे हे पाहिलं नाही, असंही त्यांनी सांगितलं.
माझ्याविरोधात जो गुन्हा दाखल करण्यात आलाय. त्याला पोलिसांकडून बळ दिलं जातंय. हे मनाला लागतेय. त्या महिलेवर जो गुन्हा दाखल केलाय. ती उघडपणे फिरत आहे. तरीही पोलीस तिला अटक का करत नाहीये? असा सवाल त्यांनी केलाय.
आमच्याच मुलामुलींनी तिला पकडलं आणि काही केलं तर. ती कुठे लपलीय हे पोलिसांना माहीत नाहीये का? मला वेड लागलंय. कायद्याच्या विरोधात असेल असं काम माझ्या हातून होऊ नये.
जर पोलीस तिला मदत करत असेल, ही केस दाबण्याचा प्रयत्न करत असेल आणि माझ्याविरोधात अजून एक केस दाखल करण्याचा प्रयत्न करत आहेत. माझ्याविरोधात बलात्काराचा गुगुन्हा दाखल करण्याचा डाव आखत आहेत, असा खळबळजनक दावाही त्यांनी केला.