सावरकर आणि गोळवलकरांच्या दृष्टीने संभाजी राजे व्यसनाधीन आणि…; जितेंद्र आव्हाड यांच्या ‘त्या’ ट्विटने खळबळ

| Updated on: Jan 02, 2023 | 9:46 AM

संभाजी राजे व्यसनी होते, हा इतिहास चुकीचा आहे. पण इतिहासामध्ये तसे बिंबवण्याचा प्रयत्न केला जातोय. आधी दादोजी कोंडदेव हे शिवाजी महाराजांचे गुरु होते असं दाखवलं गेल.

सावरकर आणि गोळवलकरांच्या दृष्टीने संभाजी राजे व्यसनाधीन आणि...; जितेंद्र आव्हाड यांच्या त्या ट्विटने खळबळ
जितेंद्र आव्हाड
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

ठाणे: छत्रपती संभाजी महाराज स्वराज्य रक्षक होते. ते धर्मवीर नव्हते, असं विधान राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केलं. त्यावरून भाजपने अजित पवार यांना घेरण्याचा प्रयत्न केला आहे. अजित पवार यांच्या विरोधात जोरदार आंदोलन करण्याचा इशाराही भाजपने दिला असून अजितदादांनी माफी मागण्याची मागणीही केली आहे. राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी मात्र अजितदादांना घेरणाऱ्या भाजपला जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. संभाजी राजांच्या नाजूक इतिहासात जाऊ नका नाहीतर मोठा‌ वाद निर्माण होईल, असा इशारा देतानाच सावरकर आणि गोळवलकर यांच्या दृष्टीने संभाजी महाराज स्त्रीलंपट आणि व्यसनाधीन होते, असा दावाच जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

हे सुद्धा वाचा

जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करून हा खळबळजनक दावा केला आहे. तसेच एका मराठी आणि इंग्रजी पुस्तकांची दोन पानेही आव्हाड यांनी ट्विट केली आहेत. सावरकरांनी व माधव गोळवलकरांनी छत्रपती संभाजी ह्यांच्या बद्दल काय लिहून ठेवले ते वाचा.

या शूरवीरास बदनाम करण्याचे काम एका वर्गाकडून अनेकवेळा झाले आहे. सावरकर आणि गोळवलकरांच्या दृष्टींने संभाजी राजे हे स्त्री लंपट आणि व्यसनाधीन होते. कोणी बोलेल ह्याच्या वर? असा सवाल जितेंद्र आव्हाड यांनी या ट्विटमधून केला आहे.

शंभूराजे स्वराज्य रक्षक आणि धर्मरक्षकही होते. जे स्वराज्य शिवाजी महाराजांनी रयतेसाठी निर्माण केले, त्याचे रक्षण करण्याचे काम शंभू राजेंनी केले. त्यांना धर्म म्हणजे महाराष्ट्र धर्म सगळ्यांना सामावून घेणारा मराठा धर्म अभिप्रेत होता. त्यामुळे स्वराज्य आणि धर्म बाजूला कसे काढता येतील? असा सवालही आव्हाड यांनी केला आहे.

औरंगजेबाला माहिती कुणी दिली?

तसेच टीव्ही9 मराठीशीही आव्हाड यांनी संवाद साधत या मुद्द्यावर आपली भूमिका स्पष्ट केली आहे. संभाजी राजांच्या नाजूक इतिहासात जाऊ नका. नाहीतर मोठा‌ वाद निर्माण होईल. संभाजी राजे संगमेश्वरला आहेत ही माहिती औरंगजेबाला कोणी पुरवली? हा इतिहास जरा नीट विरोधकांनी लक्षात ठेवावा, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

विशिष्ट समाजाचा राग

छत्रपती शिवाजी महाराजांची काही लोकांनी हत्या केल्याचं प्रतापराव गुजर यांनी त्यांना सांगितलं होतं. संभाजी राजेंनाही तसंच वाटत होतं. ही माहिती मिळाल्यानंतर संभाजी राजांनी ज्यांनी शिवाजी महाराजांना मारलं त्यांना ठार केलं. त्यामुळं एका विशिष्ट समाजातल्या लोकांना संभाजीराजेंचा राग होता आणि त्या रागापोटीच संभाजी राजेंना बदनाम केलं जात आहे, असा दावाही त्यांनी केला.

तो इतिहास चुकीचाच

संभाजी राजे व्यसनी होते, हा इतिहास चुकीचा आहे. पण इतिहासामध्ये तसे बिंबवण्याचा प्रयत्न केला जातोय. आधी दादोजी कोंडदेव हे शिवाजी महाराजांचे गुरु होते असं दाखवलं गेल. त्यानंतर बाजीप्रभू देशपांडे यांनाही शिवाजी महाराजांच्या पातळीवर आणण्याचा प्रयत्न केला गेला. हे इतिहासाचे विडंबन आहे.

संभाजी राजांना ज्या पद्धतीने जीभ काढून, डोळे काढून, तुकडे तुकडे करून मारण्यात आलं. ते केवळ त्यांचा ठावठिकाणा औरंगजेबाला लागल्यामुळं झालं. कोणी हा ठावठिकाणा सांगितला याचे उत्तर द्यावं लागेल, असा इशाराच त्यांनी दिला.