ठाणे: केंद्र सरकारने येत्या 14 फेब्रुवारी रोजी काऊ हग डे साजरा करण्यास सांगितलं आहे. गायींना प्रेमाने मिठी मारण्याचे फर्मान सरकारने काढले आहे. सरकारच्या या निर्णयावर जोरदार टीका होताना दिसत आहे. त्यावरून केंद्र सरकारवर टीका होत आहे. राजकारण्यांकडून तर केंद्रावर टीका केली जात आहेच, पण नेटकरीही मिम्सच्या माध्यमातून सरकारच्या या निर्णयाची खिल्ली उडवताना दिसत आहे. ही टीका सुरू असतानाच आता राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी त्यात उडी घेतली आहे. गायीला मिठी कशी मारायची? कुठून मारायची? असा सवाल करत जितेंद्र आव्हाड यांनी केंद्र सरकारला घेरलं आहे.
व्हॅलेंटाईन डेला प्रेयसीऐवजी गायींना मिठी मारा, असं अजब आवाहन केंद्र सरकारने केलं आहे. त्यावर जितेंद्र आव्हाड यांनी ही खोचक टीका केली आहे. गायीला नेमकी मिठी कशी मारायची? कुठून मारायची? हे शासनाने सांगावं, असा खोचक सवाल जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.
व्हॅलेंटाईन डे हा दिवस प्रेमाचं प्रतिक आहे. व्हॅलेंटाईन डेला अनेक वर्षाची परंपरा आहे आणि याचं स्वरूप बदलत गेलं. भारतातलं त्याचं स्वरूप बदललं. व्हॅलेंटाईन डे हा प्रेमाचा दिवस आहे, त्यामध्ये आईसुद्धा प्रेमाचं प्रतिक असू शकते. गाईवर प्रेम करा, त्याला हरकत नाही. पण गायी आणायच्या कुठून? शासनाकडून गायी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत का?, असा सवाल त्यांनी केला.
Feb 14 ला #CowHugDay सराव pic.twitter.com/R4cMfgQgnB
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) February 9, 2023
गाईला नेमकी मिठी कशी मारायची? कुठून मारली तर शिंग मारणार नाही. मागून मिठी मारली तर लाथ मारणार नाही ना? गायीचे पोट खूप मोठे असते. एवढ्या मोठ्या पोटाला मिठी कशी मारणार? मिठी मारायची कशी हे सरकार दाखवणार का? गायीला मिठी कशी मारायची याचं प्रात्यक्षिक सरकारने 24 तास आधी टीव्हीवर दाखवावं. तरुणांना गायी उपलब्ध करून द्याव्यात, असा उपरोधिक टोलाही त्यांनी लगावला.
केंद्र सरकारच्या पशू कल्याण बोर्डाने हे फर्मान काढलं आहे. येत्या 14 फेब्रुवारी रोजी काऊ हग डे साजरा करा. या दिवशी गायींना अलिंगन द्या. तिच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करा, असं आवाहन केंद्र सरकारने केलं आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयावरून शिवसेनेनेही भाजपची खिल्ली उडवली आहे.
गाय हा उपयुक्त पशू आहे, असं वीर सावरकर म्हणायचे. भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला सावरकरांचे हे विचार मान्य आहेत काय? असा सवाल ठाकरे गटाच्या शिवसेनेने केला आहे.