ठाणे : केडीएमसीत आज दिवसभरात जवळपास एक हजार नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. शहर लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर आहे. मात्र दारु विक्रेते कोरोनाचे कोणतेही नियम पाळायला तयार नाहीत. होळीच्या पूर्व संध्येला तळीरामांची एकच गर्दी दारुच्या दुकानावर दिसून आली. त्याठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला होता. एका दारुच्या दुकानात पोलिसांनी कारवाई करीत दुकान चालकास ताब्यात घेतले आहे.
केडीएमसी कोरोनाचा उद्रेक
कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीत कोरोना रुग्णांची संख्या 76 हजाराच्या घरात पोहचली आहे. आज कोरोना रुग्ण संख्येचा उद्रेक झाला. आजच्या दिवशी 996 नवे रुग्ण आढळून आले. कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने दोन दिवसांसाठी केडीएमसी आयुक्त विजय सूर्यवंशी यांनी अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद करण्याचा निर्णय घेतला होता.
बंदला व्यापाऱ्यांचा विरोध
या निर्बंधाला कल्याण डोंबिवलीतील व्यापाऱ्यांनी विरोध करीत रास्ता रोको आंदोलन केले. संध्याकाळी पालकमंत्री एकनाथ शिंदे कल्याणला आले. तेव्हा पालकमंत्र्यांच्या आदेशानंतर रविवारच्या एका दिवसाकरीता दिलासा दिला. या दिलाशाचा फायदा दारु विक्रेत्यांनी घेतला.
दारुच्या दुकानांवर गर्दी
कल्याण डोंबिवलीतील अनेक दारुच्या दुकानांवर तळीरामांची दारु खरेदीसाठी एकच गर्दी दिसून आली. सोशल डिस्टन्सिंग पाळले जात नाही. दारुसाठी तळीरामांची गर्दी पाहून दारु विक्रेता कोणतीही समज न देता नफेखोरीत व्यस्त होता. कल्याणच्या बाजारपेठ पोलिसांनी राजा वाईन्स शॉपवर कारवाई करीत वाईन्स शॉप बंद केले. चालकास ताब्यात घेतले आहे.
शहरात कोरोनाचे रुग्ण वाढत आहे. प्रादूर्भाव कमी करण्यासाठी केडीएमसी आयुक्त आणि प्रशासन सर्व परीने प्रयत्न करीत आहे. र्निबध व्यापाऱ्यांना चालणार नाहीत आणि व्यापारी नियम पाळणार नाही तर कोरोना कमी होणार कसा? असा मोठा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
हेही वाचा : नियम फक्त सर्वसामान्यांसाठीच का? मनसे आमदार राजू पाटील भडकले