कल्याण (ठाणे) : कोरोनाची दुसरी लाट आता महाराष्ट्रात धडकली आहे. राज्याची उपराजधानी नागपूरमध्ये कोरोनाचा उद्रेक झाला. त्यापाठोपाठ मुंबईतही कोरोना रुग्णांचा आकडा वाढू लागला. याशिवाय राज्यातील अनेक मोठ्या शहरांमध्ये कोरोना फोफावताना दिसतोय. मुंबईजवळील कल्याण डोंबिवली शहरातही आता कोरोनाचे नवे रुग्ण आढळू लागले आहेत. कल्याण डोंबिवलीत गेल्या काही दिवसांपासून कोरोना नियंत्रणात आला होता. मात्र, अचानक पुन्हा रुग्णसंख्या वाढू लागली आहे. शहरातील कोरोना रुग्णसंख्या पुन्हा नियंत्रणात आणण्यासाठी केडीएमसी महापालिका आयुक्त विजय सूर्यवंशी यांनी काही गाईडलाईन्स जारी केल्या आहेत. या गाईडलाईन्स केडीएमसीच्या अधिकृत फेसबुक पेजवर सांगण्यात आल्या आहेत (KDMC guidelines on corona pandemic).
नेमक्या गाईडलाईन्स काय?
महापालिका क्षेत्रातील प्रभागक्षेत्रअंतर्गत कोविड रुग्ण ज्या इमारतीमध्ये आढळून आला आहे ती इमारत प्रतिबंधित / सील करण्यात येणार.
विना मास्क तसेच मास्क आणि तोंड झाकेल असा मास्क ज्यांनी परिधान केला नाही अशा नागरिकांवर पोलीस विभागाच्या मदतीने दंडात्मक कारवाई करण्यात येईल.
मॉल, भाजी मंडई, व्यापारी, दुकाने आणि इतर सार्वजनिक ठिकाणी सोशल डिस्टंसिंग न पाळणाऱ्या आणि विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल.
मंगल कार्यालये, बँकेट हॉल इत्यादी ठिकाणी लग्नसमारंभासाठी 50 पेक्षा जास्त व्यक्ती आढळल्यास, तसेच या कार्यक्रमात मास्क आणि सोशल डिस्टन्सिंगचे पालन होत नसेल तर सदर अस्थापनांवर दंडात्मक कारवाई करून आस्थापना सील करण्याची कारवाई करण्यात येईल.
रेस्टॉरंट, हॉटेल, उपाहारगृहे, मद्यालये 50 टक्के क्षमतेने सुरू असल्याची तपासणी करून सदर नियमांचेच पालन होत नसल्याचे निदर्शनास आल्यास त्या आस्थापनावर दंडात्मक कारवाई करण्यात येईल. त्याचबरोबर सदर आस्थापना सील करण्याची कार्यवाही करण्यात येईल.
दुकाने, हॉल, रेस्टॉरंट,मद्यालये इत्यादी मधील कामगार /कर्मचारी आणि फेरीवाले यांची अँटीजेन टेस्ट करण्याची व्यवस्था करणेबाबत तसेच खाजगी रुग्णालये दवाखाने इत्यादी ठिकाणी कोविड सदृश रुग्णांची अँटीजेन /swab टेस्ट करण्याबाबतच्या सूचना द्याव्यात, अशा सूचना आयुक्तांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
सिटी स्कॅन केंद्रामधून स्कॅनिंग केलेल्या रुग्णांना कोविड सदृश लक्षणे आढळून आल्यास अशा रुग्णांची त्वरित RTPCR test करून घेण्याची कार्यवाही पूर्ण करावी. तसेच महापालिकेने कोविड रुग्णांच्या उपचारासाठी तात्पुरत्या स्वरूपात उभारलेल्या कोविड रुग्णालयाची तपासणी करावी, असे निर्देश महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी वैद्यकीय आरोग्य अधिकारी यांना दिले आहेत.
हेही वाचा : कल्याण डोंबिवलीत कोरोना फोफावला, आयुक्त अॅक्शन मोडमध्ये, रस्त्यावर उतरुन पाहणी!