ठाणे : कल्याण रेल्वे स्थानकात फलाट क्रमांक चारवर मुंबई-बनारस एक्स्प्रेस रेल्वेसमोर थरार पाहायला मिळाला. एक्स्प्रेस रेल्वेगाडी सुरू होताच एका 86 वर्षीय आजोबांनी ट्रेनसमोर उडी घेतली. यानंतर एकच गोंधळ उडाला. आजोबांचा जीव जाणार असंच चित्र असतानाच रेल्वे कर्मचाऱ्यांनी प्रसंगावधान दाखवत सतर्कता बाळगल्यानं आजोबा वाचले. या कर्मचाऱ्यांनी तातडीने हालचाली करत या आजोबांना रेल्वेखाली जाण्यापासून रोखलं. या कामात लोको पायलट एस. के. प्रधान आणि सहाय्यक लोको पायलट रवी शंकर यांनी मोलाची भूमिका पार पाडली. त्यांचं यासाठी कौतुक होत आहे. हा प्रकार झाला तेव्हा या कर्मचाऱ्यांनी आजोबांना नेमकं कसं वाचवलं याचा हा खास आढावा.
हरीप्रसाद कर्ण नावाचे 86 वर्षीय आजोबा हे आडीवली ढोकली परिसरात राहतात. त्यांच्या राहत्या घरी पाणी नव्हते. त्यामुळे पाणी आणून देण्यासाठी त्यांनी आपल्या नातीला सांगितले. मात्र, नातीने पाणी देण्यास नकार देत “बाबा तुमचा दुसरा मुलगा पण आहे. तुम्ही तिकडेही जाऊ शकता,” असे सांगितले. त्यानंतर वृद्ध हरीप्रसाद कर्ण रागावले. त्यानंतर ते त्यांच्या दुसऱ्या मुलाच्या घरी गेले. मात्र, या ठिकाणीसुद्धा आजोबांचे बिनसले. नेमका काय घटनाक्रम झाला याचे तपशील समोर आले नाही. मात्र, दोन्ही मुलांकडे निराशा झाल्यानं संतापलेले आजोबा रागाच्या भरात कल्याण रेल्वे स्थानकात आले.
रेल्वस्थानकावर आल्यानंतर आजोबा फलाट क्रमांक चारवर मुंबई-बनारस एक्स्प्रेस या रेल्वेजवळ आले. ही गाडी सुरु गाडी सुरु होताच आजोबांनी ट्रेनसमोर खाली उतरले. हे सगळं काही अचानकपणे घडल्यामुळे लोको पायलट एस. के. प्रधान आणि सहाय्यक लोको पायलट रवी शंकर काहीसे गोंधळले. मात्र, यांच्या सर्तकतेमुळे आजोबांचे प्राण वाचले. आजोबा गाडीसमोर आल्याचे पाहून एस.के. प्रधान आणि रवी शंकर यांनी इमर्जन्सी ब्रेक दाबले. परिणामी इंजिनखाली येऊन सुद्धा हरीप्रसाद बचावले.
दरम्यान, आडीवली ढोकली परिसरातील पाणी प्रश्नावर प्रशासनाचे स्थानिक माजी अपक्ष नगरसेवक कुणाल पाटील यांनी लक्ष्य वेधले आहे. आज पुन्हा पाणी प्रश्नामुळे एका आजोबांवर आत्महत्येची वेळ आली. ही अत्यंत गंभीर बाब असल्याचे सांगून आत्ता तरी प्रशासनाने जागे होण्याची गरज पाटील यांनी व्यक्त केली आहे. तर दुसरीकडे फक्त पाणी मिळाले नाही म्हणून आजोबांनी एवढे मोठे पाऊल उचलले म्हणून सगळीकडे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. आजोबांनी आत्महत्येचा प्रयत्न केलेला हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
Know how railway staff save life of 86 year old citizen in Kalyan while suicide