उल्हासनगरमध्ये पाचव्या मजल्यावरून लिफ्ट कोसळली, आजोबांनी नातवाला छातीशी कवटाळलं, आणि…, काय घडलं?

| Updated on: Jul 28, 2024 | 7:34 PM

उल्हासनगरमध्ये पाचव्या मजल्यावरुन लिफ्ट कोसळल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे संबंधित सोसायटीत एकच खळबळ उडाली आहे. या घटनेत एका आजोबांना दुखापत झाली आहे. त्यांना सध्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

उल्हासनगरमध्ये पाचव्या मजल्यावरून लिफ्ट कोसळली, आजोबांनी नातवाला छातीशी कवटाळलं, आणि..., काय घडलं?
उल्हासनगरमध्ये पाचव्या मजल्यावरून लिफ्ट कोसळली
Follow us on

उल्हासनगरमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. उल्हासनगरमधील एका इमारतीत पाचव्या मजल्यावरुन थेट खाली लिफ्ट कोसळली आहे. या घटनेत एका आजोबांनी आपल्या नातवाला वाचवलं आहे. पण स्वत: गंभीर दुखापतग्रस्त झाले आहेत. या घटनेमुळे संबंधित इमारतीत एकच खळबळ उडाली आहे. लिफ्ट नेमकी कोसळली कशी? तिच्यामध्ये बिघाड झाला होता का? तिचं देखभालीचं काम सोसायटीकडून झालं होतं का? असे अनेक प्रश्न या घटनेनंतर उपस्थित होत आहेत. विशेष म्हणजे या घटनेनंतर लिफ्ट सोयीस्कर जरी असली तरी सुरक्षित कितपत आहे? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतोय.

सरदार पिंजारी असं या घटनेत जखमी असलेल्या आजोबांचं नाव आहे. ते आपल्या नातवासह पाचव्या मजल्यावरून लिफ्टने खाली येत होते. यावेळी अचानक लिफ्ट कोसळल्याची घटना घडली. यावेळी लिफ्टमध्ये असलेले जेष्ठ नागरिक सरदार पिंजारी यांना आपल्या अडीच वर्षीय नातवाला वाचवण्यात यश आलं. पण ते या घटनेत गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांच्यावर सध्या उपचार सुरु आहेत.

नेमकं काय घडलं?

सरदार पिंजारी हे आपल्या अडीच वर्षीय नातवासह उल्हासनगर कॅम्प नंबर ४ येथील सत्यजीवन इमारतीत राहणाऱ्या भावाला भेटण्यासाठी आले होते. भावाची भेट झाल्यानंतर पिंजारी हे इमारतीच्या पाचव्या मजल्यावरून लिफ्टने खाली येत असताना अचानक लिफ्टमध्ये बिघाड झाल्याने लिफ्ट पाचव्या मजल्यावरून सरळ खालच्या मजल्यावर येऊन आदळली. यावेळी लिफ्टमधील काही भाग हा सरदार पिंजारी यांच्या अंगावर उडाला. ज्यात पिंजारी यांच्या हाताचं आणि पायाचं हाड फ्रॅक्चर झालं. पिंजारी यांच्यासोबत त्यांचा अडीच वर्षाचा नातू देखील होता. पिंजारी यांनी त्याला आपल्या छातीकडे पकडून वाचवलं, पण त्यांना स्वतःला मात्र गंभीर दुखापत झाली.