ठाणे (विनायक डावरुंग) : कल्याण आणि ठाणे लोकसभेच्या जागेवरुन शिंदे गट शिवसेना आणि भाजपामध्ये एक अंतर्गत स्पर्धा सुरु होती. ठाणे आणि कल्याण क्षेत्रात एकनाथ शिंदे यांचं वर्चवस्व आहे. भाजपाने सुद्धा या दोन्ही मतदारसंघात आपली पकड निर्माण केलीय. शिवसेना एकसंध होती, तेव्हा या दोन्ही जागा शिवसेनेकडे होत्या. पण मागच्यावर्षी राज्यात सत्तांतर झालं. शिवसेनेत बंड झालं. 40 आमदार आणि काही खासदार उद्धव ठाकरे यांची साथ सोडून एकनाथ शिंदेंसोबत सरकारमध्ये सहभागी झाले. आता शिवसेनेच नाव आणि चिन्ह एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे. सध्या कल्याण लोकसभा मतदारसंघातून श्रीकांत शिंदे खासदार आहेत. ते एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव आहेत. ठाण्यातून राजन विचारे खासदार आहेत. राजन विचारे उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहेत. या दोन्ही मतदारसंघांवरुन मागच्या काही दिवसांपासून शिवसेना शिंदे गट आणि भाजपामध्ये कुरबुरी सुरु होत्या.
कल्याण-डोंबिवलीत स्थानिक पातळीवर शिवसेना शिंदे गट आणि भाजपाच्या स्थानिक नेत्यांमध्ये शाब्दीक वाद झाले. बॅनरबाजी झाली. ही जागा कोणाकडे जाणार हा मुख्य मुद्दा होता. पण आता यावर तोडगा निघाल्याची माहिती आहे. कल्याण-डोंबिवलीत दोन्ही पक्षांची ताकत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कल्याणची जागा शिंदे गटाला आणि ठाण्याच्या जागेवर भाजपा दावा करु शकतो. लोकसभा निवडणुकीत मतभेद, मनभेद नको, म्हणून तोडाग काढण्यात आला आहे अशी सूत्रांची माहिती आहे. कल्याणची जागा शिवसेना शिंदे गटाला आणि ठाण्याची जागा भाजपाला असा भाजपा निवडणूक समितीत स्थानिक पदाधिकाऱ्यांमार्फत प्रस्ताव मांडला जाऊ शकतो.
सर्व निर्णय कुठे होतात?
“लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या जागेसंदर्भातील सर्व निर्णय हे दिल्ली संसदीय बोर्डाच्या बैठकीत होतात. एनडीएचा प्रत्येक उमेदवार निवडून आणायचा आहे. नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान बनवायच आहे. एनडीएचे 400 पेक्षा जास्त उमेदवार निवडणून आणण्याच लक्ष्य आहे. कल्याण लोकसभा क्षेत्रातून डॉ. श्रीकांत शिंदेच खासदार होतील” असा दावा भाजपा नेते आणि आमदार रविंद्र चव्हाण यांनी केला.