ठाणे : ठाण्यातलं राजकारण गेल्या तीन दिवसांपासून तापलं आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्या रोशनी शिंदे यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या शिवसेनेच्या (Shiv Sena) महिला कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याचा आरोप करण्यात येतोय. या मारहाणीत रोशनी शिंदे (Roshni Shinde) या गंभीर जखमी झाल्या असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या प्रकरणी पोलिसांकडून अद्याप गुन्हा दाखल झालेला नाही. पोलीस या प्रकरणाचा तक्रार करत आहेत. याउलट रोशनी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल सोशल मीडियावर केलेल्या वादग्रस्त पोस्ट प्रकरणी त्यांच्या विरोधात दोन वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. याच प्रकरणी महाविकास आघाडीने ठाण्यात आज भव्य मोर्चा काढला आहे.
उद्धव ठाकरे यांनी काल सपत्नीक रोशनी शिंदे यांची ठाण्यात येऊन भेट घेतली होती. त्यानंतर त्यांनी ठाण्याच्या पोलीस आयुक्तालयाला भेट देत आयुक्तांची भेट घेण्याचा प्रयत्न केला. पण त्यांची भेट होऊ शकली नव्हती. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सडकून टीका केली. तसेच उद्धव ठाकरेंनी आक्रोश मोर्चाची घोषणा केली होती. त्यानंतर आज ठाण्यात महाविकास आघाडीचा मोर्चा निघाला.
या मोर्चाला ठाणेकरांनी प्रचंड प्रतिसाद दिलाय. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे हे या मोर्चाचं नेतृत्व करत आहेत. या मोर्चात ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे, खासदार विनायक राऊत, राजन विचारे यांच्यासह काँग्रेसचे देखील सर्व स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्ते या मोर्चात सहभागी झाले. या मोर्चात प्रचंड गर्दी बघायला मिळतेय.
ठाण्यात तलावपाळी ते पोलीस आयुक्त कार्यालय असा हा मोर्चा काढण्यात आलाय. रोशनी शिंदे मारहाण प्रकरणात पोलिसांची आणि सरकारच्या भूमिकेविरोधात महाविकास आघाडीने हा मोर्चा काढण्यात आला. या मोर्चादरम्यान आदित्य ठाकरे, जितेंद्र आव्हाड यांच्यासह इतर नेत्यांनी आनंद दिघे यांच्या समाधीस्थळी वंदन करत पुष्पहार अर्पण केला. त्यानंतर हा मोर्चा पोलीस आयुक्त कार्यालयाबाहेर दाखल झाला. तिथे सभा आयोजित करण्यात आली आहे. महाविकास आघाडीचे नेते जनसभेला संबोधित करणार आहेत.
ठाण्यातल्या महिला मारहाण प्रकरणावरुन उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केल्यानंतर भाजपकडून अतिशय टोकाची टीका करण्यात आली. या टीका-टीप्पणीत महाराष्ट्राचं राजकारण अतिशय खालच्या पातळीवर जाताना दिसत आहेत. असं असताना आता भाजप नेत्यांच्या टीकेला आदित्य ठाकरे कसं प्रत्युत्तर देतात ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.