राज ठाकरे यांच्या ‘त्या’ विधानावर मनोज जरांगे यांची पहिली प्रतिक्रिया; काय म्हणाले जरांगे?

| Updated on: Nov 21, 2023 | 3:47 PM

मराठा समाज कुणबी असल्याच्या नोंदी आता सापडत आहेत. कुणाच्या तरी दबावामुळे नोंदी बाहेर येत नव्हत्या. आता नोंदी सापडत येत आहेत, असं सांगतानाच येत्या 24 तारखेनंतर मुंबईत येऊ की नाही हे अजून ठरलेलं नाही. आम्ही मराठा समाजाची बैठक घेऊ. त्यात मुंबईत यायचं की नाही याचा निर्णय घेऊ, असं मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलं. जरांगे पाटील हे ठाण्यात आले होते. यावेळी त्यांनी मीडियाशी संवाद साधला.

राज ठाकरे यांच्या त्या विधानावर मनोज जरांगे यांची पहिली प्रतिक्रिया; काय म्हणाले जरांगे?
raj thackeray
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

ठाणे | 21 नोव्हेंबर 2023 : मनोज जरांगे पाटील यांच्या मागे कोण आहे, कालांतराने कळेलच, असं विधान मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलं होतं. त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांचा बोलविता धनी कोण? अशी चर्चा रंगली होती. मनोज जरांगे यावर काय बोलतात याकडेही सर्वांचं लक्ष लागलं होतं. अखेर मनोज जरांगे पाटील यांनी राज ठाकरे यांना उत्तर दिलं आहे. आमच्या आंदोलनामागे कोण आहे ते लवकर शोधा. आम्हालाही सांगा. आम्हाला फक्त सांगा, आम्ही त्याला नीट करतो, असा चिमटा मनोज जरांगे पाटील यांनी काढला आहे.

मनोज जरांगे पाटील हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यात आले होते. ठाण्यात त्यांची आज प्रचंड मोठी रॅली पार पडली. रॅली नंतर सभा झाली. त्यानंतर त्यांनी मीडियाशी संवाद साधला. यावेळी त्यांना राज ठाकरे यांच्या विधानाबाबत विचारण्यात आलं. त्यावर जरांगे पाटील यांनी उपरोधिक उत्तर दिलं. आमच्या मागे कोण आहे हे लवकरच शोधून सांगा. तुमच्या जास्त ओळखी आहेत. आमच्या कमी आहेत. लवकर शोधून आणा. आम्हाला फक्त त्यांचं नाव सांगा. आमच्या मागे कोण आहे? आम्हीच त्याला नीट करतो. आमच्या मागे एकच आहे आणि तो म्हणजे मराठा समाज. ते आम्हाला माहीत आहे, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.

आम्हाला शिकवण्याची गरज नाही

एखाद्या माणसाला पढवलं तर त्याला बोलता येत नाही. तो अडखळतो. तो जेवढं शिकवलं तेवढंच बोलतो. आम्ही समाजाच्या मनातील वेदना मांडतो. आम्हाला कुणी शिकवण्याची गरज नाही. आमच्या वेदना आम्हाला माहीत आहेत, असा चिमटा काढतानाच आमच्या आंदोलनात आमच्यावर अनेक आरोप झाले. काही लोकांनी तर आम्हाला सत्ताधाऱ्यांनीच आंदोलनाला बसवल्याचा आरोप केला. साधी गोष्ट आहे, कोणताही सत्ताधारी कधी आपल्याच विरोधात कुणाला आंदोलनाला बसवेल काय? आपल्याच सरकारविरोधात कोणी असंतोष निर्माण करेल काय? असा सवाल त्यांनी केला.

त्यांना कसं अडवता?

मंडल कमिनशनने त्यांना आरक्षण दिलं आहे. त्याला आम्ही हात लावत नाही. ओबीसी आरक्षणासाठी जे निकष लागतात ते निकष मराठाच काय इतर कुणाकडेही असेल तर तुम्ही त्यांना कसं अडवता? असा सवाल त्यांनी एका प्रश्नावर बोलताना दिला.

एक शंका आहे

अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ हे अधिक आक्रमक झाले आहेत. भुजबळ ज्या पद्धतीने टीका करत आहेत. त्यावरून त्यांच्या मागे कोणी आहे काय? तुम्हाला काय वाटतं? असा सवाल जरांगे यांना करण्यात आला. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. भुजबळांचा बोलविता धनी कोण असेल वाटत नाही. त्यांचे विचार तसेच आहेत. ते विदूषकासारखे बोलतात. एक शंका येते. इतके वक्तव्य करत असताना जातीत तेढ निर्माण होण्याचा विषय आला. त्यांना थांबवत नाही. ते सरकारमध्ये आहे. त्यामुळे त्यांच्या मागे कोणी तरी असेल ही शंका आहे, असंही ते म्हणाले.