ठाणे | 21 नोव्हेंबर 2023 : जालन्यातील अंतरवली सराटीत झालेल्या लाठीचार्जवरून मनोज जरांगे पाटील यांनी गंभीर आरोप केला आहे. अंतरवलीतील हल्ल्याचा कट प्रशासनानेच रचल्याचा गंभीर आरोप केला आहे. आधीही आमच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले. आमच्यावर हल्ला झाला. मार आम्हाला लागला होता. कट हा प्रशासनानेच रचला होता. आमच्यावरच 120 ब आणि 360 चे गुन्हे दाखल केले होते. आम्ही शांततेत आंदोलन करत होतो. कायद्याचं नियम पाळून आंदोलन करत होतो. आमच्यावरच हल्ले केले. आमच्यावरच अन्याय झाला, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.
मनोज जरांगे पाटील हे ठाण्यात आले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यात जरांगे पाटील यांनी रोड शो केला. त्यानंतर एका सभेला संबोधित केलं. त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेऊन मीडियाशी संवाद साधला. अंतरवली सराटीतील हल्ल्याप्रकरणी ज्यांना निलंबित केलं, त्यांना थोड्या दिवसासाठी निलंबित केल्याची माहिती मिळते. त्यांना जास्तीच्या पोस्टिंग देऊन रुजू केलं आहे. सरकारला जनतेने गादीवर बसवलंय की अधिकाऱ्यांनी? तुम्हाला कोण महत्त्वाचं आहे? तुम्ही अधिकाऱ्यांना सांभाळत आहात. सरकारने भूमिका स्पष्ट केली पाहिजे, अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली.
काल धाराशीव, इस्लामपूर, मायनी, सातारा, कोल्हापूर आणि कल्याणमध्ये मराठा कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल केले आहेत. कितीही गुन्हे दाखल केले तरी आम्ही घाबरणार नाही. आम्ही खोट्या केसेस अंगावर घेऊ. आम्ही लढणारच आहोत. आम्ही ओबीसी आरक्षणात आरक्षण घेणारच आहोत. जे घटनेच्या पदावर बसले आहेत, ते कायदा आणि सुव्यवस्था बिघडवत आहेत. जातीय दंगली घडवण्याचा त्यांचा उद्देश आहे. ज्यांनी कायदा पायदळी तुडवला त्यांची इच्छा तर सरकार पूर्ण करत नाही ना? असा संशय येतोय, असंही जरांगे पाटील म्हणाले.
कुणाची जातीय तेढ निर्माण करण्याची इच्छा असली तरी मराठ्यांनी बळी पडायचं नाही. शांततेत आंदोलन करायचं आहे. रात्र न् दिवस आम्ही जागत आहोत. सामाजिक परिस्थिती बिघडणार नाही याची काळजी घेत आहे. राज्यात काही होता कामा नये. शांततेतचं आवाहन केल्यामुळे तुम्ही गुन्हे दाखल करत आहात. जे कायदा सुव्यवस्था बिघडवत आहेत. त्यांना तर तुम्ही बळ देत नाही ना? हे कसं सरकार आहे? कोणता न्याय देत आहात? असा सवालही त्यांनी केला.
तुम्ही दिलेल्या शब्दाप्रमाणे न्याय द्या. 24 डिसेंबरच्या आत आरक्षण द्या. गुन्हे मागे घ्या, टाईम बाऊंड जो ठरला तो अंतरवलीत जाण्याच्या आधी द्या. आम्ही 23 तारखेला जाणार आहोत. आरक्षण हा 24 डिसेंबरचा विषय आहे, असंही ते म्हणाले.