पालघर : ठाणे शहरातील वाहतूककोंडी टाळण्यासाठी शहराच्या वेशीवर तात्पुरते पार्किंग प्लाझा तयार करण्याचा निर्णय नगरविकास तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे. उरण, जेएनपीटी, खारेगाव, सोनाळे, दापोडी याप्रमाणेच आता पालघर आणि ठाण्याच्या सीमेवरील दापचारी येथेही पार्किंग प्लाझासाठी जागा अंतिम करण्यात आल्या आहेत. एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी (30 सप्टेंबर) या भागाचा दौरा करुन या जागा अंतिम केल्यानंतर लागलीच या ठिकाणी कामाला सुरुवात करण्यात आली आहे.
गेल्या काही दिवसांपासून ठाणे शहरातील वाहतूककोंडी वाढल्यामुळे त्याचा नागरिकांना त्रास होत होता. रस्त्यांवरील खड्डे, विकासकामे यामुळे या वाहतूककोंडीत भर पडली होती. त्यामुळे शहरातील रस्त्यांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र पहायला मिळत होते. हेच चित्र बदलण्यासाठी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी पुढाकार घेतला आहे.
मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गालगत दापचारी गावातील दोन जमिनी या आज पार्किंग प्लाझासाठी निश्चित करण्यात आल्या. यातील पहिली जमीन सात एकर, तर दुसरी जमीन चार एकर आहे. या दोन्ही शासकीय जमिनी आहेत. याठिकाणी अहमदाबाद येथून मुंबईकडे येणारी वाहतूक थांबवून त्याचे नियोजन करुन ती पुढे पाठवण्यात येतील. पालघर जिल्हाधिकारी आणि पालघर पोलीस अधीक्षक याबाबतचे नियोजन करणार आहेत. या जागांचे तातडीने सपाटीकरण करण्याचे निर्देश आज शिंदे यांनी दोन्ही अधिकाऱ्यांना दिले.
यासाठी गुजरात राज्यातील वलसाड जिल्हा प्रशासनाशी बोलणे झाले आहे. त्यांनीही या वाहनांचे नियमन करण्यासाठी उचित सहकार्य करायला होकार दिला आहे. या माध्यमातून मुंबई-अहमदाबाद महामार्गावरुन ठाणेमार्गे जेएनपीटीकडे जाणाऱ्या वाहनांचे नियमन करणे शक्य होणार असल्याचे शिंदे यांनी स्पष्ट केले.
ठाणे शहरातील वाहतूककोंडीला जबाबदार असलेल्या अनेक कारणांपैकी अवजड वाहनांची संख्या हे देखील प्रमुख कारण असल्याने या वाहनांचे नियोजन करून टप्प्याटप्प्याने ती शहरात सोडण्याचा निर्णय वाहतूक विभागासोबत घेतलेल्या बैठकीत घेण्यात आला होता. त्यानुसार सिडकोच्या ताब्यातील 100 हेक्टर जमिनीवर पार्किंग प्लाझा उभारणे, जेएनपीटी येथील अवजड वाहनांचे स्टिकर्स लावून नियमन करणे तसेच सिडको, जेएनपीटी, रायगड पोलीस यांच्या माध्यमातून या अवजड वाहतुकीचे नियोजन करण्याचे निर्देश एकनाथ शिंदे यांनी काल (29 सप्टेंबर) दिले होते.
दुसरीकडे खरेगाव टोलनाका येथेही भूखंड अंतिम करुन सपाटीकरणाच्या कामाला काल सुरुवात झाली. मुंबई-नाशिक महामार्गावरील सोनाळे, दापोडी आणि भिवंडी-मनोर मार्गावरील ग्रामीण पट्ट्यातील पार्किंग लॉटसाठी उपलब्ध असलेल्या जागांची पाहणीही एकनाथ शिंदे यांनी केली होती. दापचारी येथे आज एकनाथ शिंदे यांनी पाहणी करुन जागा निश्चित केल्या. यावेळी पालघरचे जिल्हाधिकारी माणिक गुरसळ, पालघर जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक दत्ता शिंदे आणि इतर अधिकारी उपस्थित होते.
हेही वाचा :
पाऊस थांबताच ठाण्यात पुन्हा फेरिवाला हटाव सुरू; अनधिकृत इमारतींवरही हातोडा