गणेश थोरात, टीव्ही 9 मराठी प्रतिनिधी, ठाणे | 26 नोव्हेंबर 2023 : मनसेने पुन्हा एकदा मराठी पाट्यांचा मुद्दा हाती घेतला आहे. दुकानांवर मराठी पाट्या लावण्यासाठी मनसेने 25 नोव्हेंबरची डेडलाईन दिली होती. ही डेडलाईन कालच संपली आहे. त्यामुळे मनसे आज आक्रमक झालेली दिसली. ज्या दुकानांवर मराठी पाट्या नाहीत त्या दुकानांच्या पाट्यांना मनसे कार्यकर्त्यांनी काळं फासत आंदोलन केलं. यावेळी मनसे कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. त्यामुळे काही काळ सोलापूर, ठाणे आणि दहिसर परिसरात गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं.
मनसेच्या कार्यकर्त्यांनी आज सकाळीच दहिसर आणि ठाण्यात खळ्ळखट्ट्याक आंदोलन केलं. मराठी पाट्या न लावणाऱ्या दुकानांना मनसे कार्यकर्त्यांनी टार्गेट केलं. या कार्यकर्त्यांनी दुकानांवरील इंग्रजी पाट्यांना काळं फासत निषेध नोंदवला. दुकाने आणि शोरुमलाही मनसे कार्यकर्त्यांनी लक्ष्य करत जोरदार घोषणाबाजीही दिली. दहिसरमध्ये तर दुकानांची तोडफोड करण्यात आली होती. त्यामुळे या परिसरातील वातावरण चांगलंच तापलं होतं. यावेळी मनसे कार्यकर्त्यांनी मनसे जिंदाबाद आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा विजय असोच्या घोषणा दिल्या.
मनसे कार्यकर्त्यांनी दहिसरमध्ये दुकानावरील इंग्रजी फलक फोडला. दिलेली डेडलाइन संपल्यानंतर आज पहाटे 6 वाजण्याच्या सुमारास मनसेने काही दुकानावरील इंग्रजीत लिहिलेल्या दुकानाच्या पाट्यांची तोडफोड केली. या इंग्रजी पाट्यांवर काळे फासले. दुकानांवर मराठीत पाट्या लावण्याचे आवाहन करणारे पोस्टर्स आणि बॅनर्स मनसेने मुंबईभर लावले होते. काल मनसेने दिलेली डेडलाईन संपल्यानंतर आज सकाळीच दहिसर परिसरातील काही दुकानांना काळे फासण्यात आले असून काही दुकानांच्या पाट्या मनसे कार्यकर्त्यांनी फोडल्या आहेत.
ठाण्यातील मानपाडा या भागात असणाऱ्या एमजी मोटर्स कारच्या शोरुमवर इंग्रजी पाटी होती. त्या इंग्रजी पाटीवर शाईचे फुगे फेकून मनसेने निषेध नोंदवला. मनसेचे पदाधिकारी स्वप्निल महेंद्रकर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. यावेळी मनसेचे काही कार्यकर्ते उपस्थित होते. ठाण्यातील आस्थापनावरील इंग्रजी भाषेतील पाट्या मराठी भाषेत केल्या नाही तर आम्ही पुन्हा तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा मनसैनिक स्वप्निल महिंद्रकर यांनी दिला आहे.
सोलापुरातही मनसेने खळ्ळखट्ट्याक आंदोलन केले. माढा तालुक्यातील मोडनिंब येथे मनसे अधिक आक्रमक झाली. दुकानावरील पाट्या इंग्रजीत असल्याने या पाट्यांवर मनसे सैनिकांनी काळं फासत निषेध नोंदवला. मनसेचे जिल्हाध्यक्ष प्रशांत गिड्डे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. प्रत्येक दुकानावरील पाट्या मराठीत असाव्यात असे आदेश कोर्टाने दिले असताना मराठी पाटी न लावल्याने मनसे आक्रमक झाली आहे.