महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडला. राज ठाकरे यांनी मनसे आमदार राजू पाटील यांच्या मतदारसंघापासून विधानसभेच्या प्रचाराला सुरुवात केली. ज्या जागांवर जिंकून येण्याची शक्यता आहे त्या जागांवर आपण आधी सभा घेत असल्याचं राज ठाकरे यांनी आपल्या भाषणाचा सुरुवातीलाच जाहीर केलं. यानंतर राज ठाकरे यांनी राज्यातील गेल्या काही वर्षांपासूनच्या राजकीय घडामोडींवर रोखठोक भाष्य केलं. त्यांनी पक्ष फोडाफोडीच्या राजकारणावरुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर सडकून टीका केली. पण त्यांनी भाजपच्या विरोधात भूमिका मांडली नाही. विशेष म्हणजे राज ठाकरे यांनी यावेळी लाडकी बहीण योजनेचा उल्लेख करतही निशाणा साधला.
“महाराष्ट्राचा उत्तर प्रदेश बिहार करायचा आहे का? मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाआधी एक बाई भोजपूरी गाण्यावर नाचतेय आहे. ही लाडकी बहीण योजना आहे? आपण कुठे चाललो आहोत. व्यासपीठावर नाचायला मुली आणल्या जाताय. या घाणेरड्या राजकारणापासून महाराष्ट्र वाचवायचा आहे. कोणत्याही पक्षापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. महाराष्ट्र बरबाद झाला तर छत्रपतींचं नाव घेता येणार नाही. इतके प्रश्न प्रलंबित असताना चेष्टा सुरु आहे. जिंवत आहात ना? जागे आहात ना? १५ तारखेला पुन्हा सभा आहे. इतर गोष्टींवर तेव्हा बोलेन. इतकंच सांगणं आहे महाराष्ट्रासाठी जागे व्हा. अनेकांचा डोळा या महाराष्ट्रावर आहे. तुमचं यावर लक्ष असलं पाहिजे. हे जे सगळं सुरु आहे ते तुम्ही बंद केले पाहिजे. एकदा माझाकडे सत्ता देऊन बघा”, असं आवाहन राज ठाकरे यांनी यावेळी केलं.