‘उद्धव ठाकरेंनी सासुरवाडी सांभाळायला पाहिजे’, मनसे आमदाराचा खोचक टोला

| Updated on: Oct 27, 2022 | 11:27 PM

"डोंबिवली ही माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची सासुरवाडी आहे. त्यांनी सांभाळायला पाहिजे", असा टोला मनसे आमदार राजू पाटील यांनी लगावला.

उद्धव ठाकरेंनी सासुरवाडी सांभाळायला पाहिजे, मनसे आमदाराचा खोचक टोला
Follow us on

डोंबिवली : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्याने शिवसेना पक्षाला मोठं खिंडार पडलंय. एकनाथ शिंदे यांनी जवळपास 40 आमदारांना सोबत नेलंच पण त्यासोबत राज्यातील वेगवेगळ्या ठिकाणी स्थानिक पातळीवर हजारो कार्यकर्ते एकनाथ शिंदे यांच्या गटात सहभागी झाले आहेत. शिंदेंच्या बंडखोरीमुळे शिवसेनेत उभी फुट पडलीय. कार्यकर्त्यांचा एक गट ठाकरेंना पाठिंबा देतोय. तर एक गट एकनाथ शिंदे यांना पाठिंबा देतोय. कधी काळी एकत्र शिवतीर्थावर दसरा मेळाव्याला येणारे कार्यकर्ते आता शिवसेनेतील या संघर्षामुळे आमनेसामने आले आहेत. शिवसेनेत घडलेल्या या संघर्षामुळे कार्यकर्त्यांमध्ये देखील मोठी फुट पडली आहे. त्यातून कार्यकर्त्यांमध्ये देखील संघर्ष बघायला मिळतोय. डोंबिवलीतील आजचा शिवसेना शाखेवरुन झालेला संघर्ष हे ताजं उदाहरण आहे. या संघर्षात शिंदे गटाने डोंबिवली मध्यवर्ती शाखेवर ताबा मिळवला. पण या घटनेवर मनसे आमदार राजू पाटील यांनी उद्धव ठाकरे यांना टोला लगावला आहे.

“शाखा कुणाची, त्यावर ताबा कुणाचा असायला पाहिजे किंवा नको असावा, तो त्या गटांचा विषय आहे. तो त्यांचा सर्वस्वी प्रश्न आहे. पण मला असं वाटतं, डोंबिवली ही माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची सासुरवाडी आहे. त्यांनी सांभाळायला पाहिजे. एकीकडे कार्यकर्ते रस्त्यावर उतरत असताना नेतृत्वने सुद्धा लक्ष द्यायला पाहिजे. मी एक कार्यकर्ता म्हणून भावना मांडतोय. बाकी माझा तसा काही त्या गोष्टीशी संबंध नाही. त्यांचं त्यांना लख लाभो”, अशी प्रतिक्रिया आमदार राजू पाटील यांनी मांडली.


डोंबिवलीत आज मध्यवर्ती शाखेवरुन ठाकरे आणि शिंदे गटात चांगलाच संघर्ष बघायला मिळाला. ठाकरे गटाच्या महिला कार्यकर्ता शाखेत दाखल झाल्या, त्यानंतर शिंदे गटाच्या महिला कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. दोन्ही गटातील वाद विकोपाला जात असातानाच या घटनेची माहिती तातडीने पोलिसांपर्यंत पोहोचली. पोलिसांना या घटनेची चाहूल मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले.

हे सुद्धा वाचा

मध्यवर्ती शाखेचं रजिस्ट्रेशन हे आमच्याकडून झाले होते, असा दावा शिंदे गटाकडून करण्यात आला. तर ठाकरे गटाकडून शाखेवर आपलाच हक्क असल्याचा दावा करण्यात आला. या दरम्यान शाखेत पोलीस दाखल झाले. पोलिसांनी आक्रमक झालेल्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं. त्यामुळे मोठा राडा टळला. या घटनेनंतर परिसरात बराच वेळ तणावाचं वातावरण होतं. पोलिसांनी घटनेचं गांभीर्य ओळखून शाखेबाहेर काही काळ बंदोबस्त लावला होता. अखेर या सर्व घडामोडींदरम्यान शिंदे गटाने शाखेवर ताबा मिळवला. याच घटनेवरुन मनसे आमदार राजू पाटलांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला.