कल्याण: कल्याण-डोंबिवली महापालिकेची (kdmc) निवडणूक तोंडावर असतानाच मनसेला (mns) जबरदस्त धक्का बसला आहे. कल्याण डोंबिवली महापालिकेतील मनसेचे दोन माजी नगरसेवक आणि असंख्य पदाधिकारी आज शिवसेनेत (shivsena) प्रवेश करणार आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत आज दुपारी हा प्रवेश सोहळा पार पडणार आहे. राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्या राजकीय डावपेचामुळे कल्याण डोंबिवलीत मनसेला मोठं खिंडार पडलं आहे. निवडणुका हाता तोंडावर आलेल्या आहेत. सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केलेली आहे. सर्वच राजकीय पक्षांनी खासकरून मुंबई, ठाणे, कल्याण डोंबिवली, पुणे, नाशिक आणि औरंगाबाद महापालिकेवर लक्ष केंद्रीत केलं आहे. अशावेळी केडीएमसीमध्ये मनसेला खिंडार पडल्याने मनसेसाठी हा मोठा हादरा मानला जात आहे.
घारीवली, काटई, उसरघर येथील मनसेच्या माजी नगरसेविका पूजा गजानन पाटील, मनसे तालुका प्रमुक व कृषी उत्पन्न बाजार समिती सदस्य गजानन पाटील आणि माजी नगरसेवक तसेच मनसेचे जिल्हा सचिव प्रकाश माने हे शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. त्यांच्यासोबत मनसेचे विभाग अध्यक्ष सुभाष तुकाराम पाटील, उप विभाग सचिव पांडे अण्णा, शाखा अध्यक्ष निशांत पाटील, भास्कर गांगुर्डे आणि विठ्ठल शिंदे आदीही शिवसेनेत प्रवेश करणार आहे.
मनसेच्या विद्यार्थी सेनेचे विभाग अध्यक्ष प्रवीण परदेशी आणि विद्यार्थी सेनेचे शाखा अध्यक्ष संदीप मोरे यांनीही मनसेला सोडचिठ्ठी दिली आहे. आज दुपारी 4 वाजता वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितत हा प्रवेश होणार आहे.
दरम्यान, दोन दिवसांपूर्वीच सर्वोच्च न्यायालयाने दोन आठवड्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच निवडणूक परिसीमनाचा राज्य सरकारने स्वत:कडे घेतलेला अधिकारही कोर्टाने रद्द ठरवला आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाला दोन आठवड्यात निवडणूक कार्यक्रम घोषित करावा लागणार आहे. कोर्टाच्या या निर्णयामुळे यंदा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवाय पार पडणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. निवडणुकीचा कार्यक्रम कधीही जाहीर होण्याची शक्यता असल्यामुळे सर्वच राजकीय पक्षांनी आता मोर्चेबांधणी सुरू केली आहे. त्यामुळे आता आयाराम गयारामांचंही पक्षांतर सुरू झालं आहे.