“राजकारणात प्रेरणा मिळते या हेतूने कोकण महोत्सवासाठी ठाण्यात आलोय. 1990 साली बाळासाहेब ठाकरेंनी कोकणात जाऊन उभा रहा असं सांगितलं. मी त्यांना, कोकणात कोणी ओळखत नाही असे सांगून मुंबईत उभा राहतो असं सागितलं. त्यांनी, ही त्यांची मागणी असल्याच सांगितल्यावर त्यांना नमस्कार करून त्या ठिकाणी मी गेलो. सिंधुदुर्गात 90 ची निवडणूक लढवली. त्यात मी जिंकलो” असं माजी केंद्रीय मंत्री आणि खासदार नारायण राणे म्हणाले. ठाण्यातील शिवाई नगर येथे आयोजित कोकण ग्रामविकास मंडळ 26 व्या मालवण महोत्सवात खासदार नारायण राणे बोलत होते. “35 वर्षांपूर्वी कोकणात खूप समस्या होत्या. पाणी, आरोग्यासारखे प्रश्न होते. महाराष्ट्र विधानसभेच्या 11 व्या मूळ वाचनालयात कोकणावरची पुस्तक घेतली आणि त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. सिंधुदुर्गात पाण्याचा टँकर लागत नाही. बारा महिने पाणी मिळेल अशी व्यवस्था आहे” असं नारायण राणे म्हणाले.
“जी धरणं पाहिजेत ती त्या वेळेला पूर्ण केली. आता काही धरणांचे काम सुरू आहे. शिक्षणासह काहीच त्या ठिकाणी आम्ही बाकी ठेवलं नाही. मनोहर जोशी मुख्यमंत्री असताना 400 पेक्षा जास्त शिक्षक जागा मंजूर करून घेतल्या. वर्ग शिक्षक नाही अशी तक्रार कोणी करू शकत नाही. मेडिकल व इंजिनिअरिंग कॉलेज सुरू केलं आहे. कोकणाच्या जेवणापासून सगळ्या गोष्टी लोकांना कळाव्यात यासाठी हा कोकण महोत्सव विषय लावून धरला आणि मुंबईत सुरू केला” असं नारायण राणे म्हणाले.
‘काही वर्षात तुमची इकडे दुकानं झाली पाहिजेत’
“आज लाखोंचा फायदा आहे. मात्र, काही वर्षात तुमची इकडे दुकानं झाली पाहिजेत. या महोत्सवाला सगळ्या जातीच्या-धर्माच्या लोकांनी यावं. सिंधुदुर्ग पर्यटन जिल्हा म्हणून मी मंजूर करून आणला. आता मोठा निधी येतो” असं नारायण राणे म्हणाले. “विमानतळापासून सगळ्या गोष्टी करायला गेलो तर काही लोक येतात आणि आंदोलनं करतात. दगडावर शेती येते म्हणून सांगतात. मी उभा राहिलो, काम सुरुवात केली. मात्र आज टेक्निकल गोष्टींमुळे त्या ठिकाणी काम बंद आहे” असं नारायण राणे म्हणाले.
‘शिवसेनेची काँग्रेस झाली का? लोकांना विचारा’
वाल्मिक कराडच्या विषयावर बोलतान नारायण राणे म्हणाले की, “सरकारने कारवाई केली, वाल्मिक आतमध्ये आहे. सरकार कमी पडले नाही, योग्य कारवाई होत आहे” शिवसेनेची काँग्रेस झाली असं भास्कर जाधव म्हणाले, त्यावरही नारायण राणे बोलले. “काँग्रेसची शिवसेना झाली की शिवसेनेची काँग्रेस झाली लोकांना विचारा. भास्कर जाधव यांचं मत आहे ते खर आहे, शिवसेना संपली आहे, त्यांचे आमदार, खासदार कोकणात नाहीत” असं नारायण राणे म्हणाले, संजय राऊतांबद्दल विचारताच ते म्हणाले की, “माझा दिवस चांगला गेला, कशाला त्याचं नाव काढता. आज एक बोलतो, उद्या सरेंडर होतो. त्यांची वैचारिकता संपली आहे. खच्चीकरण झालं आहे, नैराश्यात गेले आहेत ते”