अंबरनाथ : अंबरनाथच्या वालधुनी नदीत (Waldhuni River) रासायनिक कंपन्यांकडून रासायनिक सांडपाणी सोडलं जात असल्याची बाब समोर आली आहे. याप्रकरणी एमपीसीबीनं 9 कंपन्यांना नोटीसा (Notice) बजावल्या आहेत. अंबरनाथच्या तावलीच्या डोंगरातून वालधुनी नदी उगम पावते. पुढे काकोळ्याच्या धरणापासून ही नदी अंबरनाथ शहराकडे वाहत येते. या नदीत अंबरनाथ एमआयडीसीतल्या रासायनिक कंपन्या रासायनिक सांडपाणी सोडत असल्यानं या नदीचा मागील काही वर्षात अक्षरशः रासायनिक नाला झाला आहे. (MPCB issues notice to 9 companies in Ambernath’s Valdhuni river)
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून काही सामाजिक संस्था आणि अंबरनाथ पालिका यांच्या वतीनं वालधुनी नदी संवर्धन मोहीम सुरू करण्यात आली होती. या मोहिमेत काकोळे गावापासून काही अंतरावर रासायनिक कंपन्यांमधून सोडलं जाणारं रासायनिक सांडपाणी थेट नदीत मिसळत असल्याचं लक्षात आल्यानं याठिकाणी बंधारा घालून नदीचा नैसर्गिक प्रवाह थांबवण्यात आला. तर कंपन्यांमधून सोडलं जाणारं रासायनिक सांडपाणी वालधुनीच्या पात्रातून पुढे जाऊ लागलं. त्यामुळं सध्याचं चित्र पाहिलं, तर एकीकडे स्वच्छ नितळ पाण्याची वालधुनी नदी आणि दुसरीकडे रासायनिक कंपन्यांचं सांडपाणी असं चित्र पाहायला मिळतंय.
ही बाब मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष शैलेश शिर्के यांनी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या निदर्शनास आणून दिली. यानंतर प्रदूषण नियंत्रण मंडळानं रासायनिक सांडपाणी सोडणाऱ्या 9 कंपन्यांना नोटीस बजावली असून 7 दिवसात हे प्रदूषण थांबवण्यास सांगितलं आहे. तसंच त्यानंतरही जर प्रदूषण सुरू राहिलं, तर कंपन्यांवर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आलाय. दरम्यान आजपर्यंत अशा अनेक नोटीसा कंपन्यांना देण्यात आल्या असून तरीही कंपन्यांकडून प्रदूषण सुरूच असल्याचं पाहायला मिळतंय. त्यामुळं आम्हाला आता कायदा हातात घ्यायची वेळ आणू नका, असा इशारा मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष शैलेश शिर्के यांनी दिला आहे.
वालधुनी नदीत होत असलेल्या प्रदूषणासंदर्भात यापूर्वी राष्ट्रीय हरित लवादाने एमआयडीसी आणि स्थानिक नगरपालिका यांना 100 कोटी रुपयांचा दंड ठोठावला होता. मात्र तरीही सध्याची परिस्थिती ‘जैसे थे’च आहे. त्यामुळं हा जलस्रोत टिकवायचा असेल, तर रासायनिक प्रदूषण थांबवणं गरजेचं आहे. या सगळ्याची आता वरच्या पातळीवरून नोंद घेतली जाणं गरजेचं आहे. (MPCB issues notice to 9 companies in Ambernath’s Valdhuni river)
इतर बातम्या
Kalyan Snake Rescue : कल्याणमध्ये सर्पमित्रांकडून एकाच दिवशी चार सापांची सुटका
केडीएमसीत कचऱ्यापासून 10 हजार मॅट्रिक टन खत निर्मिती, सोलापूर नाशिक पुण्यातून मागणी