ठाणे : लाचारांचा नव्हे इथे विचारांचा मान, भगवे आमचे रक्त, प्राण आमचे श्रीराम, अशा शब्दात उद्धव ठाकरे यांना ठणकावून सांगण्यात आलंय. एकनाथ शिंदे समर्थित शिवसेना पक्षाचे नेते आणि ठाणे महानगरपालिकेचे माजी महापौर नरेश म्हस्के यांनी उद्धव ठाकरे यांच्याविरोधात टीकास्त्र डागताना हा इशारा दिलाय. एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत गेलेल्या नेत्यांवर राज्यभरातून गद्दार, चोर अशी टीका केली जातेय. मात्र आम्ही बंडखोरी का केली, याचं स्पष्टीकरण शिंदेसेनेकडूनही वारंवार दिलं जातंय. काल रामनवमीनिमित्त राज्यभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. ठाण्यातील एका कार्यक्रमाला उपस्थित नरेश म्हस्के यांनी भाविकांना रामनवमीच्या शुभेच्छा देतानाच विरोधकांना जोरदार इशारा दिला.
आम्ही जे ओरिजनल आहोत. बाळा साहेबांचं हिंदुत्व आम्ही स्वीकारलेलं आहे. आम्ही फक्त नावासाठी श्रीराम म्हणत नाहीत. काही लोक लाचारी दाखवले सत्तेसाठी काँग्रेस असो राष्ट्रवादी असो त्यांच्याशी आघाडी केलेली आहे. आमच्या बाण कोणाला लागल असेल जो धनुष्य बाण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब जो हातात घेतले आहेत या बॅनर मुळे कोणाला लागलं असेल तर तो ना इलाज असेल..
हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी वीर सावरकरांचा अपमान करणाऱ्यांना जोडे मारले होते, पण तुम्ही सत्तेसाठी त्यांच्यासोबत जाऊन बसताय, यावरून नरेश म्हस्के यांनी उद्धव ठाकरे यांना इशारा दिला. ते म्हणाले, ‘ स्वतंत्र्यवीर सावरकरांनी स्वातंत्र्य चळवळीत खूप कष्ट केले. बंदीवास भोगला. कष्ट घेतले. पण राहुल गांधींनी त्यांना माफीवीर म्हणून हिणवलं. मणिशंकर अय्यर यांनी सावरकरांवर टीका केली तेव्हा बाळा साहेब ठाकरे यांनी रत्यावर उतरून त्यांच्या प्रतिमेला जोड्याने हाणले होते, तुम्ही तर त्यांच्या सोबत बसतात…
मुख्यमंत्र्यांच्या डॉक्टरेट पदवीवरून संजय राऊतांनी केलेल्या टीकेला नरेश म्हस्के यांनी उत्तर दिलं. मुख्यमंत्र्यांना जी पदवी मिळाली, ती समाजसेवेसाठी मिळाली आहे. तुम्ही कोरोना काळात घराच्या बाहेरच गेला नाहीत, त्यामुळे तुम्हाला ते कळणार नाही, अशी खोचक टीका नरेश म्हस्के यांनी केली.
शिवसेना खासदार संजय राऊत यांनाच शिवसेना फोडण्यासाठी पदवी द्यावी, अशी खोचक टीका नरेश म्हस्के यांनी केला आहे. ते म्हणाले, ‘ कदाचित संजय राऊत यांना डिलीट देणं गरजेचं आहे. कारण संजय राऊतने शिवसेना फोडली म्हणून उद्धव ठाकरेंना बाळासाहेबांचा विचार विसरायला लावले,याबद्दल राष्ट्रवादीची स्क्रिप्ट उद्धव ठाकरेंच्या मनामध्ये ठासून भरली. त्याकरिता संजय राऊत यांना एखाद्या विद्यापीठाकडून डॉक्टरेट पदवी मिळाली पाहिजे, अशी टीका म्हस्के यांनी केली.