ठाणे : महाराष्ट्राचे माजी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यावर एका महिलेने विनयभंगाचा आरोप केल्यामुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. जितेंद्र आव्हाड यांच्या ठाणे येथील मतदारसंघात काल एका उड्डाणपूलाच्या लोकार्पणाचा कार्यक्रम होता. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक दिग्गज नेते उपस्थित होते. या कार्यक्रमात आलेल्या भाजपच्या एका महिला कार्यकर्ताने जितेंद्र आव्हाड यांच्यावर विनयभंगाचा आरोप केलाय. या प्रकरणी संबंधित महिलेने पोलीस ठाण्यात तक्रार केलीय. त्यानंतर जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल झालाय. महिलेच्या या आरोपांमुळे जितेंद्र आव्हाड व्यथित झाले आहेत. त्यांनी आपल्या आमदाराकीचा थेट राजीनामा आपल्या पक्षाच्या अध्यक्षांकडे पाठवलाय. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये एकच खळबळ उडालीय.
आव्हाडांच्या राजीनाम्यानंतर पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आज सांगलीहून ठाण्यात दाखल झाले. त्यांनी आव्हाडांसोबत बातचित केली आणि एकत्र पत्रकार परिषद घेतली. यावेळी जयंत पाटील यांनी पक्षाची नेमकी भूमिका काय आहे, याबाबत माहिती दिली.
“आम्हाला, पक्षातील सर्वांना जितेंद्र आव्हाड यांचा राजीनामा नकोय. ते महाराष्ट्र विधानसभा आणि राज्यातील एक उभरते नेतृत्व आहेत. त्यामुळे त्यांनी राजीनामा देवू नये, यासाठी आमचे प्रयत्न सुरु आहेत”, असं जयंत पाटील म्हणाले.
“आम्ही त्यांना समजवण्याचा प्रयत्न करतोय. त्यासाठीच मी सांगलीहून आलोय. मी आमच्या पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी बोललोय. जितेंद्र आव्हाड यांच्याशीदेखील बोलणं सुरुय. राजीनामा देणं हा योग्य मार्ग नाही. बघुया काय होतं ते”, अशी प्रतिक्रिया जयंत पाटील यांनी दिली.
जयंत पाटील यांनी यावेळी कालच्या कार्यक्रमातील घटनाक्रमही सांगितला. “जितेंद्र आव्हाड आधी मुख्यमंत्र्यांच्या गाडीकडे जाताना दिसत आहेत. त्याचवेळी त्या भगिनी गर्दीत मुख्यमंत्र्यांच्या गाडीत येण्याचा प्रयत्न करतात. तेव्हा स्थानिक खासदार हे आव्हाड यांच्याकडे येताना दिसतात”, असं पाटील सांगतात.
“तेव्हा गाडीकडे जाण्यासाठी आव्हाड खासदारांना वाट करून देतात आणि ते मागे वळतात. त्यानंतर आव्हाड या महिलेला बाजूने जा, गर्दीत का येतात असं म्हणतात आणि पुढे जातात. त्यात कोणत्याही प्रकारची वेगळी कृती दिसत नाही”, असंही त्यांनी सांगितलं.
“व्यथित होऊन आव्हाड यांनी राजीनामा दिल्याचं कळलं. माझ्याकडे राजीनामा पाठवला. त्यामुळे मी सांगलीहून आलो. वाटेत कालच्या कार्यक्रमाच्या क्लिप्स पाहिल्या. मला काही लोकांनी माहिती दिली.जितेंद्र आव्हाड त्यांच्या मतदारसंघात कार्यक्रमाला गेले होते. ज्या भगिनीने गुन्हा दाखल केला आहे. त्या क्लिप सर्वांना उपलब्ध आहेत. त्यातून त्यांनी विनयभंग केल्याचं दिसत नाही”, असं जयंत पाटील म्हणाले.